कौतुकास्पद! आपत्ती निवारण दल उभारणारा रायगड देशातील पहिला जिल्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:31 AM2019-03-13T04:31:08+5:302019-03-13T07:00:02+5:30
३० ट्रेकर्सना खालापूरच्या डोंगरात प्रशिक्षण
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध अपघात व अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमवर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद व निवारण दलाची’ निर्मिती करण्याचा संकल्प केला होता. त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून स्वत:चे आपत्ती निवारण दल उभारणारा रायगड जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून झालेला दुर्दैवी भीषण अपघात, सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात, त्याचबरोबर रायगड किल्ल्यासह विविध किल्ले आणि गिर्यारोहणस्थळी घडलेले अपघात व अपघाती मृत्यू या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील विविध गिर्यारोहण संस्थेच्या स्वयंसेवकांना खोल दरीमधील ‘रेस्क्यू ऑपरेशन’ (बचाव कार्य) याचे प्रशिक्षण सध्या खालापूर तालुक्यातील विणेगाव येथील रॉक वॉल (कातळीची भिंत) व दरीमध्ये देण्यात येत आहे. भारतीय संरक्षण दलाच्या अधिपत्याखालील उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.