विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण

By admin | Published: July 23, 2016 02:08 AM2016-07-23T02:08:50+5:302016-07-23T02:08:50+5:30

खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे

Wonderless colonnade | विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण

विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण

Next

मनीषा म्हात्रे,

मुंबई- खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेकडून येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे एक आमदार आणि दोन नगरसेवक विक्रोळी परिसरात आहेत. एवढी राजकीय वजनदार व्यक्तिमत्त्वे असूनही रस्त्यांची मात्र दुरवस्था आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या रस्त्यांवर तब्बल २८९ खड्डे मोजून काढले.
विक्रोळी पूर्वेकडील स्टेशनलगत असलेला फाटक रोड पुढे पूर्व द्रुतगती मार्ग, कन्नमवार नगर, टागोर नगर या मार्गाला जोडला गेला आहे. या रस्त्यावर वाहनधारकांची प्रचंड वर्दळ असते. त्यात स्टेशन परिसरातच रिक्षा थांबा, बस थांबा असल्याने या गर्दीत भर पडते. शेअरिंग रिक्षांसाठीही नागरिकांची झुंबड उडते. तरीही या रस्त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हा रस्ता सेना आमदार सुनील राऊत, शिवसेना नगरसेवक विश्वास शिंदे आणि नगसेवक ताऊजी गोरुले यांच्या विभागांमध्ये येतो. शिवसेनेचे वजन असूनही या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांना वेळ मिळालेला नाही. अशात पालिकेकडूनच खासगी मजूर लावून या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केल्याचे दाखवले जात आहे. मात्र पावसाच्या एक-दोन सरींनी रस्ते पुन्हा पुन्हा खड्डेमय होत आहेत. आमदारांना वेळ नाही आणि नगरसेवक हद्दीच्या वादात गुरफटल्याने जायचे कुणाकडे, असा प्रश्न विक्रोळीकरांना पडला आहे.
>‘नगरसेवकाचे ऐकून न ऐकणे’ : नगरसेवक विश्वास शिंदे यांना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने फोनवरून संपर्क साधून रस्त्यांबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला बोला म्हणणारे शिंदे यांनी नंतर मात्र हॅलो हॅलो म्हणून फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलणे टाळले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या प्रतिक्रियेसाठी फोन केला असता, आवाज ऐकू येत नाही, असे त्यांनी सांगितले. तर नगरसेवक ताऊजी गोरुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.
>दोन ते तीन हजारांचा फटका
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रतिमहिना दोन ते तीन हजारांचा फटका बसत आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा यावर भर टाकण्यात आली. मात्र थोडासा पाऊस पडताच हे रस्ते आणखीन उखडत आहेत. याकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. -जयेश मिश्रा, रिक्षाचालक
>खड्ड्यांबाबत प्रशासन गंभीर नाही
मुंबईतील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयात २००२ पासून अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. न्यायालयाने वेळोवेळी अनेक निर्देश राज्य सरकार व महापालिकेला दिले. मात्र राज्य सरकार आणि महापालिका या आदेशांची अंमलबजावणी गांभीर्याने करीत नाहीत. आतापर्यंत उच्च न्यायालयाने तीन वेळा सरकार आणि महापालिकेला फैलावर घेतले आहे. प्रशासनाला याचे गांभीर्य असते तर प्रश्न केव्हाच निकाली निघाला असता. आता तरी प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. - जितेंद्र गुप्ता, रस्ते तज्ज्ञ
>आमदार म्हणतात, पाठपुरावा सुरू आहे !
फाटक रोडची परिस्थिती वेळोवेळी पालिकेच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. शिवाय येथील कोंडी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-सुनील राऊत, आमदार, भांडुप पूर्व, विक्रोळी विधानसभा मतदारसंघ
लेबरकडून काम
करून घेतो ना !
फाटक रोड पालिकेच्या अखत्यारीत असून जेव्हा खड्डे पडतात तेव्हा लेबरकडून काम करून घेतले जाते. गेल्या वर्षीच येथे पेव्हर ब्लॉकचे काम करून घेतले होते. मी सध्या वैद्यकीय रजेवर असून, कामावर परतल्यावर खर्चाची माहिती देतो.
-नितीन गडईरे, अभियंता,
एस वॉर्ड, रस्ते विभाग, विक्रोळी

Web Title: Wonderless colonnade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.