विजयस्तंभास मानवंदना!
By admin | Published: January 1, 2015 11:35 PM2015-01-01T23:35:16+5:302015-01-01T23:35:16+5:30
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीतीरावरील १८१८मध्ये ज्या भीमसैनिकांनी रक्त सांडले, त्यांच्या शौर्याचा इतिहास नुसता लक्षात ठेवून उपयोग नाही, तर त्यांच्या बलिदानातून पुढील पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे
कोरेगाव भीमामध्ये लाखो भीमसैनिकांची मांदियाळी :
सर्व पक्षीय, संघटनांच्या वतीने अभिवादन
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीतीरावरील १८१८मध्ये ज्या भीमसैनिकांनी रक्त सांडले, त्यांच्या शौर्याचा इतिहास नुसता लक्षात ठेवून उपयोग नाही, तर त्यांच्या बलिदानातून पुढील पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे. विजयस्तंभ हे प्रेरणास्थान झाले पाहिजे, असे मत आंबेडकर चळवळीतील सर्वच दलित नेत्यांनी मानवंदना सभेत व्यक्त केले. राज्यभरातून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी गुरुवारी (दि. १) जानेवारी हजारो आंबेडकरी विचाराचे अनुयायी व शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरेगाव भीमा/लोणीकंद : भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनआलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर अलोट गर्दी केली होती. या वेळी ‘एक स्तंभ-एक व्यासपीठ’ या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक झाले. या वेळी अनेक पक्ष-संघटनांच्या वतीनेही येथे अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली.
१९२७पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले. बुधवारी (दि. ३१) सकाळपासूनच या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आंबेडकरी बांधवांनी गर्दी केली होती. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यासाठी भीमशक्तीच्या वतीने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, आमदार गौतम चाबुकस्वार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने एम. डी. शेवाळे, नवनाथ कांबळे,, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे भीमराव आंबेडकर, दलित कोब्राचे प्रमुख अॅड. भाई विवेक चव्हाण, तसेच बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल, भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघ, बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आदींसह विविध संस्था व पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
‘‘बाबासाहेबांनी विजयस्तंभापासूनच ऊर्जा घेतली होती. त्यांना स्मरून माझ्या आंबेडकरी बांधवांनी या ऐतिहासिक क्रांतिस्तंभापासून ऊर्जा घेऊन आंबेडकर चळवळ खऱ्या अर्थाने बळकट करण्याचा प्रयत्न करीत कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक इंदू मिलच्या जागेवरच करण्यावर आपण कटिबद्ध असल्याचे सांगत तसेच घरवापसीच्या नावाखाली भारतीय राज्यघटनेचे २५वे कलम रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा खटाटोप सुरू असल्याचाही आरोप रिपब्लिकन सेनाप्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला. या वेळी माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी भीमा कोरेगाव रणस्तंभ सेवा समितीच्या वतीने साकारलेले ‘एक स्तंभ-एक व्यासपीठ’ संकल्पनेचे कौतुक करून म्हणाले, आपण सत्तेत असताना आम्ही फक्त दलित चळवळीचाच विचार करीत असून, समाजाचेच हित पाहिले आहे. विजय स्तंभ परिसराचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ तर, जोगेंद्र कवाडे म्हणाले, ‘‘आंबेडकरी जनतेवर अन्याय झाला म्हणून भीमसैनिकांनी प्राणाचे बलिदान देऊन पेशवाई नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला; समाजाने एकजूट होणे गरजेचे आहे.’’ तर, पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने फिरते शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सौरदिवेही बसविण्यात आल्याचे सरपंच राजेंद्र वाघमारे व ग्रामविकास अधिकारी बी. आर. गावडे यांनी सांगितले. या वेळी अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विजय ज्योतीही आणल्या होत्या. या वेळी मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचे सर्जेराव वाघमारे तसेच काळूराम गायकवाड यांनी स्वागत केले. (वार्ताहर)
परंपरा खंडितच....
ऐतिहासिक विजयस्तंभास गेल्या चार वर्षांपासून लष्कराच्या महार रेजिमेंटकडून देण्यात येणारी मानवंदना खंडित झाल्याची परंपरा या वर्षी सुुरू करणार असल्याची मध्य प्रदेशच्या सागर येथील महार रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरमधील कमांडिंग आॅफिसर व उच्यपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेली वल्गना हवेतच राहिली.
या वर्षी प्रथमच भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘एक स्तंभ-एक व्यासपीठ’ संकल्पेचा आग्रह धरत सर्वच पक्षनेत्यांना एका स्टेजवर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
या वेळी आठवले व कवाडे गट वगळता पाच गटांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला; मात्र पुढील वर्षी सर्वांनाच एका स्टेजवर एकत्र आणून विजयस्तंभ व परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करू, असा विश्वास वाघमारे यांनी
व्यक्त केला.
विजय रणस्तंभास प्रथमच फुलांची आकर्षक सजावट केली होती. त्यामुणे अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो घेण्यास चढाओढ केली.
खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल, पुस्तकाची मांदियाळी आणि विविध खेळण्याची रेलचेल यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते.
समितीने एकच व्यासपीठ उभारले होते. त्याचा पाच-सहा संघटनेने लाभ घेतला. त्यामुळे गर्दी, गोंगाट थोडा कमी झाला होता .
गर्दीने व गाडी पार्किंगने सगळेच रस्ते गल्लीबोळ व्यापून केले होते. रात्री उशिरापर्यंत
गर्दी होती.