लाकडी नांगर इतिहासजमा होणार ?
By Admin | Published: June 13, 2016 03:36 AM2016-06-13T03:36:37+5:302016-06-13T03:36:37+5:30
बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
वाडा : बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे पारंपारिक लाकडी नांगरही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कारण आजच्या आधुनिक युगात बैलांची नांगरणी थांबली असून त्या एैवजी शेतकरी पॉवर टिलरच्या वापराला प्राधान्य देतांना दिसतात.
दरवर्षी ७ जूनला येणारा मान्सून या वर्षी अजून सुरू झाला नसला तरी शेतकऱ्यांची मात्र धावपळ सुरू झाली असून शेती उपयुक्त अवजारांच्या दुरूस्तीची शेतकऱ्यांची कामे जोरात सुरू आहेत. बी-बीयाणे, किटकनाशके, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत सध्या गर्दी आहे.महागाई वाढली तरी खेडयापाडयातील शेतकऱ्यांना शेती हाच पर्याय असल्याने त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी लाकडी नांगरांच्या एक दोन जोडया या असणारच असा समज. एकदा जून महिना उजाडला की जमीन नांगरणीसाठी नांगर दुरूस्ती करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे, किंवा भाडयाने घेणे, नांगरणीसाठी लागणाऱ्या फळीसाठी मजबूत लाकुड शोधणे अशा कामांची शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. नांगर मजबूत टिकाऊ असावा यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर या सारख्या वृक्षांच्या लाकडाचा वापर करतात. ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलरचा वापर करू लागले आहेत. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, तसेच शारीरीक श्रम देखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
>पॉवर टिलरचे भाडे प्रतितास ४००
पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी, आदि कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करीत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमीतपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परिने आपल्या शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाडयाने घेणाऱ्या शेतकऱ्यांना ४०० रू. प्रतितास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी नांगरणीसाठी पॉवर टिलरच वापरतात. सध्या आॅर्चिड (मिनी) ट्रॅक्टरचाही वापर वाढला आहे.