राज्यभर ऊन-पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:04 AM2017-07-22T01:04:33+5:302017-07-22T01:04:33+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहिला. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. शहर, पूर्व आणि

Wool-rain throughout the state | राज्यभर ऊन-पावसाचा खेळ

राज्यभर ऊन-पावसाचा खेळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहिला. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच ठरावीक अंतराने ऊनही पडत होते. परिणामी सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी पडत असतानाच वातावरणातील बदलामुळे पडलेल्या उन्हाच्या कवडशाने मुंबापुरीत दिवसभर ऊन-पावसाचा खेळ रंगला होता.
मुंबई शहरात सकाळी कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, लोअर परेल, दादर, माटुंगा, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, माहीम आणि सायन येथे पावसाने जोरदार मारा केला. दुपारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. पूर्व उपनगरातही सकाळी कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड येथे ठिकठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या आणि दुपारी काही क्षण पडलेले ऊन वगळता येथे दुपारीही पावसाचा मारा कायम राहिला. पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल येथे सकाळी पावसाने तुफान मारा केला. विलेपार्ले, माहीम, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे मात्र सकाळी तुरळक ठिकाणी पाऊस पडला. दुपारीही कमी-अधिक फरकाने येथे अशीच अवस्था होती. एकंदर मुंबईत ऊन-पाऊस असे दुहेरी वातावरण होते.

- गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे; तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यातही पाऊस नोंदविण्यात आला आहे. २२ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २३ आणि २४ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

रायगडमध्ये पावसाची संततधार सुरूच
- रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी २४ तासांत सर्वाधिक १२७ मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. महाड येथे ७६ मि.मी. तर पोलादपूर येथे ८२ मि.मी. पाऊस चोवीस तासात झाला आहे. सततच्या पावसामुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट प्रारंभाच्या ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. परिणामी रत्नागिरी-गोव्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीवर स्थानिक प्रशासनाने वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून, सद्यस्थितीत वाहतूक सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे निवासी चाळीवर गुरुवारी दरड कोसळून सुमारे ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र येथे कोणीही जखमी झालेले नाही. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

पालघरमध्ये पावसाने घेतली उसंत
मागील चार दिवसापासून पालघर जिल्ह्याला झोडपलेल्या पावसाने आज काहीशी उसंत दिली. जव्हारच्या नदीत वाहून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी विक्र मगड मध्ये आढळून आला तर पहाटे मुंबई-अहमदाबाद राज्यमहामार्ग दोन कंटेनर मध्ये झालेल्या अपघाता मध्ये एक चालकाचा मृत्यू झाला.
पालघर जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून लावणीची कामे जोरात सुरु होऊन अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वाधिक ११८.६ मिमी इतका पाऊस तलासरी तालुक्यात पडला असून वसई तालुक्यात ४५.३ मिमी, वाडा तालुक्यात ९२.० मिमी, डहाणू ९४.९ मिमी, पालघर ३७ .५ मिमी, मोखाडा ४७.२ मिमी, विक्र मगड ३२.० मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद जव्हार २२.० मिमी झाली आहे.

पडझड : पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ३ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. शहरात ५, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात १५ अशी एकूण २५ ठिकाणी झाडे पडली. शहरात ६, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झाली नाही.

मुंंबईसाठी अंदाज : कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Wool-rain throughout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.