स्त्री अधीक्षिकांविना आश्रमशाळांचे कामकाज
By admin | Published: November 9, 2016 05:45 AM2016-11-09T05:45:57+5:302016-11-09T05:45:57+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेतील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच राज्यातील १८५४पैकी तब्बल ११२६ आश्रमशाळांमध्ये स्त्री अधीक्षिकाच
विलास गावंडे, यवतमाळ
बुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेतील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच राज्यातील १८५४पैकी तब्बल ११२६ आश्रमशाळांमध्ये स्त्री अधीक्षिकाच नसल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे स्त्री अधीक्षिकांअभावी चालणाऱ्या या आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
वंचित घटकांना शिक्षण घेता यावे यासाठी १९५३-५४पासून राज्यात आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. आदिवासी विकास विभागांतर्गत ४५६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. यातील केवळ २५२ ठिकाणी स्त्री अधीक्षिकांची नियुक्ती केली आहे. याच विभागाच्या ५२९ शासकीय आश्रमशाळा आहेत. त्यातील केवळ २९८ ठिकाणी स्त्री अधीक्षिका आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळांची स्थिती यापेक्षा गंभीर आहे. या विभागाच्या ५२९ प्राथमिक, १९६ माध्यमिक आणि १४८ कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा आहेत. एकूण ८७३पैकी केवळ १८२ ठिकाणी स्त्री अधीक्षिका कार्यरत आहेत. काही काळ थांबलेली पदभरती आणि पुढे विविध कारणांमुळे या जागा रिक्त राहिल्या. २०१४पासून स्त्री अधीक्षिका पदाची नियुक्ती आवश्यक केली. बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यूने महिला उमेदवाराची नियुक्ती करण्याचे आदेश दिले; तरीही या जागा अद्याप भरल्या नाहीत.