मेट्रो-३च्या कामाने केली झोपमोड, नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:38 AM2017-08-10T06:38:38+5:302017-08-10T06:47:23+5:30
सिप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. या झोपमोडीसाठी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी एका नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : सिप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. मात्र, यामुळे या परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. या झोपमोडीसाठी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी एका नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन मुली व पत्नीची झोपमोड होत असल्याने, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने दरदिवशी प्रत्येकी दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुलाब्याच्या एका रहिवाशाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
मेट्रो-३ प्रकल्पाचे काम करताना, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार रात्रीच्या वेळी आवाजाची पातळी ४५ डेसिबल असणे, तसेच बांधकाम करायचे असल्यास संबंधित मशिन्सना सायलेन्सर बसवणे बंधनकारक आहे. मात्र, एमएमआरसीएल या नियमांचे उल्लंघन करत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी आवाजाची पातळी मर्यादेबाहेर असते. त्यामुळे माझ्या दोन मुलींची व पत्नीची झोपमोड होत आहे. एमएमआरसीएलला माझ्या मुलींना व पत्नीला १ फेब्रुवारी २०१७पासून दरदिवशी १० हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कुलाब्याचे रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ११ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.
तसेच याचिकाकर्त्याने ही याचिका प्रलंबित असेपर्यंत कामकाजाला स्थगिती देण्याची विनंतीही केली आहे. ‘एमएमआरसीएला ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचा व रात्रीचे काम बंद करण्याचा आदेश द्यावा,’ अशीही मागणी याचिकेत केली आहे.