पक्षवाढीसाठी काम करा; अन्यथा राजीनामे द्या - आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:39 AM2017-10-04T04:39:17+5:302017-10-04T04:40:27+5:30
मी मंत्रीपदासाठी नाही, तर पक्ष वाढीसाठी काम करतो. तुम्हाला पक्ष वाढीसाठी काम करता येत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल तर राजीनामे द्या. शिस्त पाळा, अशी शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
शिर्डी : मी मंत्रीपदासाठी नाही, तर पक्ष वाढीसाठी काम करतो. तुम्हाला पक्ष वाढीसाठी काम करता येत नसेल, पक्षाला वेळ देता येत नसेल तर राजीनामे द्या. शिस्त पाळा, अशी शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी रिपाइं स्थापनेच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.
चार माणसे बरोबर राहिली नाही तरी चालेल. बेशिस्त पक्ष नको. तो बरखास्त केलेला बरा. कार्यकर्त्यांनी सोडले, तरी माझ्याबरोबर गरीब माणूस आहे, असे ते म्हणाले. मी शिर्डीत पराभूत झालो़ त्यांनी नाही, तर तुम्हीच मला हरविले. माझे चिन्ह घराघरात पोहचवले असते, तर मते वाढली असती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिर्डी जवळील सावळीविहीर येथील मैदानात उभारलेल्या दिवंगत रा. सु. गवई नगरमध्ये रिपाइं स्थापनेच्या हीरक महोत्सवानिमित्त मेळावा झाला. आठवले म्हणाले, नव्याने निघालेल्या पक्षांचे लोक निवडून येतात, पण आपले का येत नाहीत?, रिपब्लिकन पक्ष स्वत:च्या हिमतीवर लोक निवडून आणू शकत असेल तरच वर्धापन दिनाला महत्त्व असल्याचे सांगत गर्दीला मतात रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक गावात पक्षाची शाखा हवी, केवळ राजवाड्यात नको. ठरावांची अंमलबजावणी करा. सरकारी योजनांचा लाभ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले़ सुरूवातीलाच त्यांनी चारोळीतून येथे रिपब्लिकनची लाट केव्हा येणार असा सवाल
केला़
मंत्र्यांची उपस्थिती : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदींसह देशभरातून मोठ्या संख्येने भीमसैनिक मेळाव्यास उपस्थित होते.