महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम तेजीत
By Admin | Published: August 26, 2016 02:19 AM2016-08-26T02:19:10+5:302016-08-26T02:19:10+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी पावसामध्ये मोठयाप्रमाणात खड्डे पहावयास मिळतात.
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी पावसामध्ये मोठयाप्रमाणात खड्डे पहावयास मिळतात. दरवर्षी गणेशोत्सवाअगोदर हे तात्पुरते मुरमाने खड्डे भरण्याचे काम केले जाते. यंदा हे खड्डे डांबरमिश्रीत खडी (डांबर कार्पेट) ने भरण्यात येत आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा खड्डयांपासुन मुक्तता मिळणार आहे. याच मार्गावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दासगाव खिंडीतील रस्त्याचा अर्धा भाग खचला होता. मोठे काम असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून याला अद्याप मंजुरी मिळाली नाही परंतु ९ जूनला लोकमतमध्ये महामार्ग खचल्याची बातमी प्रसिध्द करण्यात आली. यामुळे सध्या एका बाजुने कार्पेट टाकल्याने याठिकाणी निर्माण झालेला अपघाताचा धोका टळला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठयाप्रमाणात होणारी वाहतूक आणि नित्कृष्ट दर्जाचे काम त्यावर पडणारा पाऊस यामुळे या मार्गावर दरवर्षी मोठ मोठे खड्डे पावसाळयात पडतात. गणपती सण हा कोकणातील मोठयाप्रमाणात साजरा करण्यात येतो. मुंबई तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी कोकणात येतात. दरवषीच्या या खड्डयांना ते त्रासलेले असतात. यंदा या सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत गेल्या आठवडयाभरापासून या मार्गाचे खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. पावसाळयात डांबर प्लॅन्ट बंद असतात. त्यामुळे मुरूमानेच खड्डे भरावे लागतात. परंतु यंदा भर पावसाळयात राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरले जात आहेत यामुळे सध्यातरी हे खड्डे चांगल्या पध्दतीने भरले जात आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभाग महाड यांच्यामार्फत लोणेरे ते परशुराम घाट या दरम्यान खड्डे भरण्याचे काम तेजीत सुरू असुन गेल्या आठवडयाभरात ६० टक्के काम पूर्ण झाले आहे व पुढील दोन चार दिवसात उर्वरित खड्डे भरण्याचे कामही पूर्ण होईल अशी माहिती महामार्गाच्या उपविभागीय कार्यालयाकडून मिळाली आहे.
>पेण ते माणगाव या मार्गाचे काम पूर्ण
पेण ते माणगाव या मार्गाचे खड्डे भरण्याचे काम पुर्ण झाले आहे. सध्या महाड हद्दीतील १०८ ते २०५ लोणेरे ते परशुराम घाट यादरम्यान खड्डे भरण्याचे काम गेली आठवडाभरापासुन कार्यकारी अभियंता एस.के. सुरवसे, पेण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गेली दहा वर्षे मुरमाने खड्डे भरले जात होते. डांबर प्लँन्ट पावसाळयात बंद असतात. परंतु या खड्डयांचा विचार करता यंदा विभागातील डांबर प्लँन्ट सुरू करून त्यातुन डांबर मिश्रीत खडी घेत पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.
>लोकमतच्या वृत्ताची दखल
यंदाच्या पावसाळयामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे महामार्गाचा अर्धाभाग खचला होता. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघातांना आमंत्रण अशी बातमी ९ जूनला लोकमतने प्रसिध्द के ली होती. या बातमीनंतर राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय महाड यांच्याकडून याठिकाणच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्या कामाला अद्याप मंजुरी मिळाली नसली तरी या लोकमतने प्रसिध्द
के लेल्याबातमीच्या आधारे महाड विभागातील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्यात आहे. डांबरमिश्रीत खडी टाकून हा भाग भरून घेण्यात आल्याने तात्पुरता तरी याठिकाणचा अपघाताचा धोका टळला असून याठिकाणाहून जाणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे ज्या पध्दतीने भरण्याचे काम सुरू आहे.
>लोकमतच्या बातमीनुसार दासगाव याठिकाणी महामार्ग खचला आहे. मात्र त्याठिकाणी कामासाठी अद्याप निधी उपलब्ध नसला तरी त्याठिकाणच्या अपघातांचा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा विचार करून त्याठिकाणच्या अर्ध्या रस्त्याच्या खचलेल्या भागात कार्पेटचा एक थर मारून घेतला असुन याठिकाणची धोक्याची तीव्रता कमी करण्यात आली आहे.
- पी.पी.गायकवाड, उपअभियंता,
पेण, महाड, राष्ट्रीय महामार्गविभाग