तलाठ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

By admin | Published: April 27, 2016 01:36 AM2016-04-27T01:36:09+5:302016-04-27T01:36:09+5:30

राज्यातील सर्व तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली.

Work jamming due to a clampdown | तलाठ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

तलाठ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

Next

पुणे- राज्यातील सर्व तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने तलाठी दफ्तरी असणारी शेतकऱ्यांची कामे स्थगित झाली. त्याची झळ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत असून विविध प्रकारचे दाखले न मिळाल्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यांतील सर्व तलाठी भाऊसाहेबांनी आपली कार्यालये बंद ठेवून कार्यालयाच्या चाव्या तालुका तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. महसूल विभागातील गावकामगार तलाठ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा दिनानिमित्त महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात कार्यक्रमात महसूल कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. राज्यभरामध्ये तलाठी कार्यालय बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. शासनाकडून वाहन सुविधाही देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते व महसूल कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक असल्याने महसूल संघटनेने संपावर जाऊ नये, असे आवाहन महसूलमंत्र्यांनी केले होते. मात्र, संघटना प्रलंबित मागण्यांवर ठाम राहिल्याने सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू झाली आहे. तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरणमधील अडथळे, ई-फेरफारमधील अडचणींची सोडवणूक (सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्व्हरची स्पीड क्षमता, नेट कनेक्टिव्हिटी) तलाठी मंडलाधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, ‘अवैध गौणखनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीने द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यातंर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे व अंशदायी निवृत्ती योजना या मागण्यांसाठी राज्यभरातील तलाठी व मंडलाधिकारी संघाने विविध टप्प्यांत आंदोलन छेडले आहे.
>लोणी काळभोर : वारंवार इशारे देऊनही तलाठी व मंडलाधिकारी संघटनेला फक्त आश्वासन मिळत आहेत. आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत राज्यभरातील बेमुदत संप कायम राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी-मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांनी दिली आहे.

Web Title: Work jamming due to a clampdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.