काळदरी पुलाचे काम रखडले
By Admin | Published: July 12, 2017 01:29 AM2017-07-12T01:29:36+5:302017-07-12T01:29:36+5:30
पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : काळदरी येथील धनकवडी रस्त्यावर थोपटेवाडीच्या ओढ्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन तातडीने पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी काळदरी, बहिरवाडी, बांदलवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
काळदरी- धनकवडी रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतुक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने तातडीने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात दोन वषार्नंतर पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
सद्यस्थितीत जुना पूल पाडण्यात आलेला असून हंगामी स्वरूपात नळ्या टाकून रस्ता सुरू आहे. किरकोळ स्वरूपात पाऊस झाला तरी हंगामी रस्त्यावरून पाणी जात आहे. सद्या पिलरचे काम अपूर्ण असून उर्वरित काम रखडले आहे.
पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केलेले असून आतापर्यंत हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दुरुस्तीचे काम अपुर्ण असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काळदरी हे गाव परींचे पासून १८ किमी अंतरावर आहे. शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बाजारपेठेत जाण्यासाठी, तसेच वीर येथे बँकेत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षात या पुलावरून वारंवार पाणी गेल्यावर अंशत: गैरसोय होत होती मात्र आता जुना पूल पाडल्यामुळे पयार्यी लगतच्या पुलाखाली असणा-या पाइप मोकळ्याच असल्याने धोका निर्माण झाला आहे. दळणवळणाची गैरसोय झाल्याने ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केली होती. सध्या याच पुलाच्या रखडलेल्या कामामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने एस. टी बसेस चालू आहेत. जोराचा पाऊस झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा डेपोच्या वतीने देण्यात आला आहे.