पालिका सभागृहाचे कामकाज तहकूब
By admin | Published: June 30, 2017 03:18 AM2017-06-30T03:18:47+5:302017-06-30T03:18:47+5:30
महापालिकेच्या अंधेरी येथील के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या विभागातील विकासकामे रखडली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या अंधेरी येथील के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या विभागातील विकासकामे रखडली आहेत. येथील बांधकामांवर मनमानी कारवाई होत आहे; आणि सहायक आयुक्तांकडून लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नाही; अशा तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी गुरुवारी सभागृहात वाचला. महत्त्वाचे म्हणजे तक्रारींचा पाढा वाचतानाच सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही केली.
लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रकरणी चौकशी करत सभागृहात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र याच प्रकरणावरून सभागृहाचे कामकाजही तहकूब करण्यात आले. दरम्यान, जैन यांनी विकासकामांमध्ये खोडा घातल्याच्या निषेधार्थ २३ जूनची प्रभाग समिती सभा तहकूब करण्यात आली होती. आणि याआधीची सभाही याच कारणात्सव तहकूब करण्यात आली होती. तर दुसरीकडे सहायक आयुक्तांच्या कार्यालयात सीसीटीव्ही लावण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली.
मुंबईतील अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, यासाठी रात्रीच्या वेळेसही महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग सुरू ठेवावा, अशी मागणी भाजपाने ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली. सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली असली तरीदेखील ही सूचना आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली आहे. अभिप्रायानुसार अंमलबजावणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.