पादचारी पुलाचे काम अद्याप सुरूच
By Admin | Published: August 6, 2016 02:31 AM2016-08-06T02:31:21+5:302016-08-06T02:31:21+5:30
वाशी - कोपरखैरणे रोडवर सेक्टर ९ व १५ दरम्यान पादचारी पूल बांधण्यासाठी जुलै २०१५ मध्ये भूमिपूजन केले होते.
नवी मुंबई : वाशी - कोपरखैरणे रोडवर सेक्टर ९ व १५ दरम्यान पादचारी पूल बांधण्यासाठी जुलै २०१५ मध्ये भूमिपूजन केले होते. बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप काम सुरूच झालेले नाही. परंतु पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची खोटी माहिती प्रशासनाने दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय, शाळा, मंदिर, व्यापारी संकुल, भाजी व कपडा मार्केटमुळे सेक्टर ९ व १५, १६ मध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते. रस्ता ओलांडावा लागत असल्याने अनेक वेळा अपघात होत असून वारंवार वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघात थांबविण्यासाठी येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली होती. सिंधूताई नाईक नगरसेविका असताना त्यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पालिकेने जानेवारी २०१२ मध्ये या प्रस्तावास मंजुरी दिली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २० जानेवारी २०१५ मध्ये पादचारी पूल बांधण्यासाठी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला. २१ जून २०१६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप काम सुरूही झालेले नाही. ठेकेदाराने येथील महावितरण कार्यालयाला लागून पदपथ
खोदला आहे. समोरील बाजूलाही खोदकाम केले होते. दोन्ही
पदपथ वाहतुकीसाठी बंद करून ठेवले आहेत.
पादचारी पुलाचे काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा स्थानिक नगरसेविका अंजली वाळुंज यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली होती. याविषयी आयुक्तांनी प्रशासनाच्यावतीने लेखी उत्तर दिले आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. येथील काम प्रगतिपथावर आहे. निविदेमधील अटी व शर्तीनुसार दंड आकारून कंत्राटदाराकडून लवकरात लवकर काम पूर्ण केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या उत्तराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पादचारी पुलाचे काम ठप्प आहे. काम सुरूच झाले नसताना ते प्रगतिपथावर आहे असे उत्तर कसे काय दिले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
>पूल शबरी हॉटेलजवळ हवा
शाळा, रुग्णालय, मार्केट असल्यामुळे या परिसरात नियमित गर्दी असते. यामुळे शबरी हॉटेलजवळ पादचारी पूल बांधण्याची गरज आहे. पालिकेने चुकीच्या ठिकाणी पुलाचे नियोजन केले असून जागेमध्ये बदल करून लवकर काम पूर्ण करण्यात यावे.
- सुरेश तुकाराम शिंदे,
सदस्य, जिल्हा नियंत्रण व दक्षता कमिटी,
ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन