‘काशिनाथ घाणेकर’च्या दुरुस्तीचे काम रखडले
By admin | Published: July 19, 2016 03:12 AM2016-07-19T03:12:30+5:302016-07-19T03:12:30+5:30
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील प्लास्टर आॅफ पॅरिसचे छत कोसळल्याची घटना घडून आता जवळजवळ अडीच महिन्यांचा काळ लोटला
ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील प्लास्टर आॅफ पॅरिसचे छत कोसळल्याची घटना घडून आता जवळजवळ अडीच महिन्यांचा काळ लोटला तरीसुद्धा अद्यापही त्याच्या दुरुस्तीस सुरुवात झालेली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नाट्यप्रेमींची घोर निराशा तर झाली आहेच, शिवाय पालिकेलाही या कालावधीत ४० लाखांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या कामाच्या निविदा अंतिम झाल्या असल्या तरी त्या अद्याप उघडल्या नसल्याचे उघड झाले आहे.
२५ एप्रिलला रात्री १२.१० च्या सुमारास ही घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश मात्र झाला होता. पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचे अहवालातही उघड झाले आहे. दरम्यान, एक महिन्यात या नाट्यगृहाची दुरुस्ती करून ते नाट्यप्रेमींच्या सेवेत हजर होईल, अशी ग्वाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार, सुरुवातीला त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा त्याच ठेकेदाराकडून करून घेण्याचा अट्टहास पालिकेने केला होता. मात्र, त्याने नकार दिल्याने अखेर पालिकेनेच या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. गेल्या महिन्याच्या अखेरीस पालिकेने या कामाचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी २४ लाख ८३ हजारांचा खर्च होणार आहे. निविदा अंतिम झाल्या असल्या तरी त्या उघडलेल्या नाहीत. त्या उघडल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरीनंतर स्थायीच्या मंजुरीसाठी तो ठेवला जाणार आहे. यासाठी जुलै महिना संपणार आहे. त्यानंतर, प्रत्यक्षात कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, हे काम सुरू झाल्यानंतरही आणखी दोन महिन्यांचा कालावधी या कामासाठी जाणार असल्याने साधारणत: दिवाळीपूर्वी नाट्यगृह नाट्यप्रेमींसाठी खुले होईल, असा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे.
पालिकेला या नाट्यगृहापासून महिनाकाठी सुमारे १३ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. गडकरी रंगायतनपेक्षा याचे उत्पन्न अधिक आहे. असे असूनही या कामाच्या दिरंगाईवरून पालिकेला आतापर्यंत ४० लाखांचा फटका बसला असून पुढील दोन महिन्यांत आणखी २६ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.