रिंगरूट प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी
By Admin | Published: August 4, 2016 03:26 AM2016-08-04T03:26:00+5:302016-08-04T03:26:00+5:30
माणकोली आणि दुर्गाडी उड्डाणपुलांसह आता शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरूट प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे.
कल्याण : माणकोली आणि दुर्गाडी उड्डाणपुलांसह आता शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या रिंगरूट प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे.
एमएमआरडीए आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी संयुक्त बैठक झाली. त्यात एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे आणि केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्यात सामंजस्य करार झाला. या प्रकल्पांतर्गत असलेला ३२ किलोमीटरचा रस्ता एमएमआरडीएला हस्तांतरित केला जाणार आहे.
रिंगरूट प्रकल्पांतर्गत दुर्गामाता चौक ते टिटवाळ्यापर्यंतचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात माणकोली उड्डाणपूल ते दुर्गामाता चौक हे काम होणार आहे. रिंगरूट प्रकल्पासाठी जी जागा लागणार आहे, ती केडीएमसीला एमएमआरडीएच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. परंतु, येथील बरीचशी जागा सीआरझेडच्या क्षेत्रात येते. सीआरझेडमध्ये टीडीआर देण्याची तरतूद नाही. त्यामुळे या जागेच्या बदल्यात योग्य मोबदला बाधितांना मिळावा, जेणेकरून संबंधित जागा लवकरात लवकर संपादित करता येईल, असे पत्र केडीएमसीने राज्य सरकारला यापूर्वीच पाठवले आहे.
दरम्यान, मंगळवारी रवींद्रन आणि खंदारे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ३२ किलोमीटरचे महापालिका एमएमआरडीएला हस्तांतरित करणार आहे. दुर्गामाता चौक ते गांधारी हा रस्ता आॅक्टोबरपर्यंत एमएमआरडीएला हस्तांतरित करून दिला जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. या वेळी महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)