केंद्राने लस, निधी देऊनही राज्य सरकारचे काम संथच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:16 AM2022-01-05T08:16:51+5:302022-01-05T08:17:06+5:30
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार; धोका लक्षात घेऊन गती वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे आता राज्याने काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारचे काम संथगतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे. परंतु, राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत मंगळवारी मंत्री भारती पवार यांनी सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना कळविले होते; पण ते आले नाहीत. अधिकारी आले आणि आम्ही आढावा घेतला, सूचना केल्या. आता राज्यांनी अंमलबजावणी करावी, असे सांगून भारती पवार म्हणाल्या की, सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावेत, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे.
यासंदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी. प्रत्येक राज्यातील स्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत चर्चा करत आहेत, असेदेखील डॉ. भारती पवार म्हणाल्या.
मदत मिळत नसल्यास मंत्र्यांनी लेखी कळवावे
केंद्र सरकारकडून आवश्यक मदत दिली जात नसल्याचे आरोप डॉ. भारती पवार यांनी यावेळी फेटाळून लावले. केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजनेशिवायही निधी मंजूर केला आहे. सर्वच बाबतीत केंद्र सरकारने राज्याला मदत दिलेली आहे. त्यामुळे जर कोणी मंत्री मदत मिळत नसल्याचे विधान करत असतील तर त्यांनी तसे लेखी कळवावे. जेणेकरून आम्ही काय दिले नाही ते तरी आम्हाला कळेल; पण केंद्राने जे दिले त्याचे काय झाले, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो, असेही पवार यावेळी म्हणाल्या.
राज्यभरात १७० निवासी डॉक्टर कोरोनाबाधित
nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णालयांमधील मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढा, या मागणीसाठी सुरू असलेला सेंट्रल मार्ड या निवासी संघटनेचा संप मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर सोमवारी संपला, मात्र आता मंगळवारी राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.
nपालिका रुग्णालयात आणि जम्बो कोरोना केंद्रांमध्ये मिळून ६० आरोग्य कर्मचारी, पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पालिका क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
nनिवासी डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण आहे. निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने कॊरोनाग्रस्त होत आहेत. अशा वेळेस त्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याऐवजी त्यांच्यावरील कामाचा भार, कामाच्या वेळेत बदल करत वाढवण्यात येत असल्याचे म्हणत निवासी डॉक्टरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.