जळगाव महापालिकेत काम बंद आंदोलन
By admin | Published: January 2, 2017 08:12 PM2017-01-02T20:12:24+5:302017-01-02T20:12:24+5:30
शिवीगाळ केल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोेलन करत थेट शहर पोलीस स्टेशन गाठले
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 2 - लोकशाही दिनी तक्रार दाखल करण्यास आलेल्या जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याशी अरेरावी करत त्यांच्यावर विविध आरोप करून शिवीगाळ केल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोेलन करत थेट शहर पोलीस स्टेशन गाठले. मनपाचे अधिकारी, कर्मचारी पोलीस स्टेशनला बराच वेळ ठाण मांडून होते. दोघांना तात्काळ अटक करा, अशी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी होती.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन केले जात असते. त्यानुसार सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह अन्य विभाग प्रमुख लोकशाही दिनाचे अर्ज स्वीकारत होते. हे कामकाज सुरू असताना ११.१५ वाजेच्या सुमारास या ठिकाणी जिल्हा जागृत जनमंचचे पदाधिकारी शिवराम पाटील व अनिल नाटेकर हे दोघे आले.
लोकशाही दिनात नियमानुसार १५ दिवस अगोदर तक्रार अर्ज देणे बंधनकारक आहे. तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी असे प्रवेशद्वाराजवळ कर्मचारी सांगत असताना शिवराम पाटील व नाटकेर यांनी चिडून आरोपांना सुरुवात केली. जोरजोराने वाद सुरू असल्याचे लक्षात आल्याने उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व अन्य काही अधिकारी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. अधिकारी आल्याचे पाहून पाटील व नाटेकर यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून शिवराळ भाषेत हुज्जत घालण्यास सुरूवात गेली. जोरजोराने हे दोघे बोलत असल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती.
कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
शहर पोलीस स्टेशन आवारात महापालिकेतील सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी एकत्र आले होते. शिवराम पाटील व अनिल नाटेकर यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी या कर्मचाऱ्यांची भूमिका होती. अखेर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवराम पाटील व नाटेकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.