भिवंडी पालिकेत तब्बल ८३९ पदे रिक्त; स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 07:13 PM2021-06-16T19:13:55+5:302021-06-16T19:16:10+5:30
भिवंडी महानगरपालिका प्रशासनात वर्ग एक ते वर्ग चार दरम्यान तब्बल ८३९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी महानगरपालिका प्रशासनात वर्ग एक ते वर्ग चार दरम्यान तब्बल ८३९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. अनेक वर्षांपासून मनपा प्रशासनात भरती प्रक्रिया न झाल्याने वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर प्रभारी अधिकारी पदाची नियुक्ती देऊन प्रशासनाचा कारभार हकावा लागत आहे. विशेष म्हणजे अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने वर्ग चार मध्ये मोडणारे व सफाई कामगार म्हणून नियुक्ती असलेले शेकडो सफाई कर्मचारी आज प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . मात्र या सफाई कामगारांची वर्णी प्रभारी अधिकारी म्हणून केली असल्याने शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून शहर स्वच्छतेबाबत याच सफाई कामगारांना दोषी ठरविले जात असतांना भ्रष्ट मार्गाने पदे बळकाविणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्त नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अनेक विभागांसह प्रभागातील अधिकारी पदावर वर्षोनुवर्षे प्रभारी नेमून करून प्रशासनाचा गाडा हाकला जात असल्याने प्रशासकीय कामाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे .
भिवंडी पालिका क्षेत्रात ४३६२ पदे मंजूर असून त्यामध्ये वर्ग एकची ३२ तर वर्ग दोनची ५० पदे मंजूर असून त्यापैकी वर्ग एकची १० व वर्ग दोन मध्ये ९ अशी १९ पदे भरली असून तब्बल ६३ पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये विभाग प्रमुख कार्यालय अधीक्षक यांसह प्रमुख पदांचा समावेश होत असून या पदावर मागील कित्येक वर्षे भरती प्रक्रिया न झाल्याने या पदांवर वर्ग तीन व वर्ग चार मधील शैक्षणिक पात्रता असलेल्या कामगार वर्गातील व्यक्तींकडे या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . तर वर्ग तीन या लिपिक संवर्ग पदावरील तब्बल ५१४ पदे रिक्त असल्याने या पदांवरती स्वच्छता कामगारांची वर्णी लावण्यात आली आहे.
यामुळे ज्या मूळ वर्ग चारच्या स्वच्छता कामगार पदावरील मंजूर २४७० पदांपैकी २३८२ पदे भरली गेली आहेत परंतु स्वच्छता विभागात आजच्या क्षणी अवघे ११५० कामगार काम करीत असून उर्वरित कामगारांपैकी सुमारे ६०० कामगार हे कार्यालयीन कामावर आहेत. तर सुमारे ३५० हुन अधिक कामगार मयत अथवा इजा निवृत्ती घेऊन बसले आहेत . या जागा अजून ही भरल्या नसल्याने शहराच्या स्वच्छतेचे काम प्रशासन ११५० कामगारां कडून करून घेत असल्याने शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून शहराची ओळख बकाल व अस्वच्छ शहर म्हणून केली जात आहे .
स्वछता कर्मचारी म्हणून नियुक्ती असलेले शेकडो कामगार हे वर्ग २ व वर्ग ३ पदावर काम करीत असल्याने त्यांच्या चुकीच्या कामाची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे . परंतु अनुकंपा अथवा वारस हक्काने स्वच्छता कामगार म्हणून दाखल होत प्रत्येक जण आपल्या महापालिकेतील गॉड फादर कडून टेबल खुर्ची वरील जागा पटकावत असल्याने मूळ स्वच्छतेच्या कामासाठी कामगारांची नेहमीच वानवा भासत आहे. या सर्व प्रकाराचा ताण मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने मनपा आयुक्त या बाबीकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंजूर पदाचा तक्ता
वर्ग - मंजूर - भरलेली - रिक्त
वर्ग १ - ३२ - १० - २२
वर्ग २ - ५० - ०९ - ४१
वर्ग ३ - ११०९ - ५९५ - ५१४
वर्ग ४ - ३१७१ - २९०९ - २६२
-----------------------------------------------
एकूण - ४३६२ - ३५२३ - ८३९