भुयारी मार्गाचे काम पुन्हा नव्याने
By admin | Published: April 26, 2016 04:23 AM2016-04-26T04:23:35+5:302016-04-26T04:23:35+5:30
बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले
बदलापूर : बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले. मात्र, या मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने येथे नेहमीच पाणी तुंबते. यामुळे वाहनचालकांना या मार्गाचा वापर करता येत नाही. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने नव्याने काम सुरू केले आहे.
अडीच वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून भुयारी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू केला. मात्र, या मार्गाच्या शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी थेट या भुयारी मार्गात येत असल्यामुळे हा मार्ग बंद करावा लागला. सतत पाणी तुंबूनही रेल्वेने हा मार्ग तसाच सुरू ठेवला.
रेल्वेच्या या हलगर्जीपणाचा फटका अनेक वाहनचालकांना बसला आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकी गाडी या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने चारचाकी गाड्या अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर, स्थानिकांनी पुढाकार घेत हा मार्ग बंद केला.
अखेर, रेल्वे प्रशासनाला उशिरा जाग आली. मार्गामधील पाणी काढण्याचे आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. भुयारी मार्गाच्या शेजारी असलेला नाला मार्गापेक्षा १२ इंच खाली घेण्यात येत आहे. तसेच भुयारी मार्गाची उंचीही आठ इंच वाढवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)