हिंदूंना सबळ करण्यासाठी संघाचे कार्य - मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:01 AM2018-05-04T06:01:44+5:302018-05-04T06:01:44+5:30
सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची
मलकापूर (बुलडाणा) : सर्व विश्वाला सर्व सुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचे, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची, हे कार्य संघ करीत असून, हे संघाचे कार्य अनेकांची तपश्चर्या व तपस्येतून उभे राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भारतीय नागरिक उत्थान समिती मलकापूरद्वारा निर्मित पू. बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण गुरुवारी भागवत यांच्या हस्ते झाले. या वास्तूत उद्ययावत अभ्यासिका व संगणक उपलब्ध आहे. यानिमित्त भागवत यांच्या जाहीर उद्बोधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिस्त अन् अनुशासन यांचा मेळ आहे. स्वयंसेवक म्हणजे शुद्ध व सात्विक आत्मीयता. सर संघ कार्यालय म्हणजे आत्मीयता व सूचीतेचा अनुभव देणारे कार्यालय, असा अनुभव प्रत्येकाला येतो. संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचे न राहता ते संपूर्ण समाजाचे व्हावे, समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, देशभक्तीच्या विचारांचे प्रेरणास्रोत व्हावे.
स्वयंसेवकांनी स्वत:चे वैयक्तिक जीवन उन्नत करावे, स्वत:च्या कुटुंबासाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी परिश्रम करावेत त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्यप्राप्त करावे; परंतु त्याच वेळी ज्या समाजामुळे आपण सुखनैव जगतो त्या समाजाचा मात्र विसर पडू देऊ नये. समाज सुखी, संपन्न, शक्तिशाली व सुस्थिर असेल तरच आपल्याला जीवन आनंदाने जगता येईल, असेही सरसंघचालक भागवत म्हणाले.
भागवत यांच्या वक्तव्याने चर्चेला पुन्हा उधाळ आले आहे़