‘स्वत:ची कंपनी समजून काम करा; यश तुमचेच’

By Admin | Published: January 24, 2017 03:45 AM2017-01-24T03:45:24+5:302017-01-24T03:45:24+5:30

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर

'Work to understand your company; Success is your ' | ‘स्वत:ची कंपनी समजून काम करा; यश तुमचेच’

‘स्वत:ची कंपनी समजून काम करा; यश तुमचेच’

googlenewsNext

औरंगाबाद : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर तुमच्या प्रगतीत कोणीही अडथळा आणू शकणार नाही. यश तुमचेच असल्याचा गुरुमंत्र प्रसिद्ध उद्योगपती व भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संचालक हनुमंत गायकवाड यांनी दिला.
औरंगाबादमधील देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात आयोजित ‘क्वसार्स-२०१७’ या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्योगपती हनुमंत गायकवाड आले होते.
यावेळी त्यांनी उद्योजकतेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. कोर्टात क्लर्क असलेल्या कुटुंबात जन्म झाला. गरिबीत कुटुंब गुजराण करीत होते. पुढे वडिलांची पुण्यातील फुगेवाडी येथे बदली झाल्यामुळे गाव सोडावे लागले. तेव्हा ९ बाय १८ च्या खोलीत आमचे सर्व कुटुंब राहत होते. याच वेळी वडील सतत आजारी पडत असल्याने आई त्यांना ससून रुग्णालयात दाखल करीत असे. एक वेळ पैसे नसल्यामुळे आईने मंगळसूत्र, कानातील दागिने ७०० रुपयांत गहाण ठेवले होते.
या गरिबीतून धडा घेत मोठे बनण्याचे स्वप्न पाहिले; यासाठी मेहनत घेत गेलो; यश मिळत गेले. आज ‘बीव्हीजी’मध्ये तब्बल ६५ हजार कर्मचारी काम करतात. सर्वांच्या सहकार्याने गरिबीची जाण ठेवून सेवा देत असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१९ व्या वर्षी ‘बीव्हीजी’ची स्थापना
भविष्याचा विचार करीत वयाच्या १९ व्या वर्षी भारत विकास ग्रुपची स्थापना केली. टाटा मोटार्समध्ये हाऊस किंपिगच्या कामांचा अनुभव होता. २००१ साली टाटा मोटार्स सोडताना हातात काहीच नव्हते. त्याचवेळी बंगलोर येथे काम मिळाले. तेथून चेन्नई, हैदराबाद, दिल्लीत कामे मिळाली. पुढे संसदेत काम करण्याची संधी चालून आली. प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न मिळाल्यामुळे आज संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास, उपराष्ट्रपती कार्यालय, सर्वोच्च न्यायालयातील हाऊसकिपिंगचे काम बीव्हीजी करत आहे. देशातील प्रथम क्रमांकाची हाऊस किपिंग कंपनी बनण्यास विश्वासू साथीदाराचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.
विवेकानंदांना आदर्श मानले : विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट यांची चरित्रे वाचण्यात आली. यातून आदर्श घेतल्याचे ते म्हणाले.
१०८ क्रमांक जाळे :महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच १०८ क्रमांकाची सेवा बीव्हीजी देत आहे. राज्यात साडेनऊशे अ‍ॅम्ब्युलन्स चालविण्यात येतात. दररोज शेकडो लोकांना आरोग्याची सेवा देण्यात येते हेच जनकल्याणचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या २२ राज्यांतील ७०० शहरांमध्ये कंपनीची कामे सुरूअसून, ६५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. हे सर्व यश १५ वर्षांत मिळवले असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी स्पष्ट केले. याशिवाय कृषी, दुग्ध क्षेत्रातही कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
ढोलांच्या गजरात स्वागत
क्वसार्स महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाविद्यालयात पोहोचताच विद्यार्थ्यांनी उद्योगपती हनुमंत गायकवाड, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमने स्वागत केले. या आनंदी वातावरणात हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले होते.

Web Title: 'Work to understand your company; Success is your '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.