शरद राव यांच्या निधनाने लढवय्या कामगार नेता हरपला - सचिन अहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 06:30 PM2016-09-01T18:30:54+5:302016-09-01T20:31:16+5:30
शरद राव यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली, अशी भावना सचिन अहिर यांनी दिवंगत कामगार नेत्याच्या आकस्मिक निधनाबाबत शोक व्यक्त केला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ज्येष्ठ झुंजार कामगार नेते आणि बेस्ट, टॅक्सी, हॉस्पिटल आदी आस्थापनांचे लढवय्ये नेते शरद राव यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिवंगत कामगार नेत्याच्या आकस्मिक निधनाबाबत शोक व्यक्त केला.
दीर्घ काळ आजारी असलेल्या शरद राव यांची प्राणज्योत आज मुंबईत मालवली. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षबांधणीसाठी घेतलेले परिश्रम विसरता येणार नाहीत. शरद राव यांनी ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या खांद्यला खांदा लावून मुंबईत उभे केलेले लढे अजरामर ठरले आहेत.
निष्ठावंत समाजवादी नेता म्हणून आपल्या तळमळीच्या कामातून समाजमनावर प्रतिमा उमटवलेल्या राव यांचे काम कदापी विसरता येणार नाहीत. कामगारांचे जटिल प्रश्न आपल्या लढावू बाण्यातून सोडवणाऱ्या शरद राव यांचे आदर्शवत काम कामगार चळवळीला कायम स्फूर्ती देत राहतील, असे अहिर म्हणाले.