सरकारविरोधात ‘श्रमिक’ची आझाद मैदानात निदर्शने!
By admin | Published: March 1, 2017 02:23 AM2017-03-01T02:23:16+5:302017-03-01T02:23:16+5:30
कामगारांची नियुक्ती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली.
मुंबई : राज्यात कायमस्वरूपी कामासाठीही शासनाकडून कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची नियुक्ती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली.
या आंदोलनात सुरक्षारक्षक, संगणक शिक्षक, बँक कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, मिड डे मिलमधील कर्मचारीही सामील झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी कामास कायमस्वरूपी कामगार नेमण्याची गरज आहे. मात्र शासन कायम कामालाही कंत्राटी, मानधनी सेवक, रोजंदारी, कॅज्युअल कामगार पद्धतीने नेमणूक करत असल्याचा आरोप महासंघाचे सरचिटणीस उदय भट यांनी केला. भट म्हणाले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस, मिड डे मिल अशा मानधनी सेवक कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर राबवून घेत आहे. मुळात कायम स्वरूपाचे काम करताना त्यांना मानधनावर राबवून शासन या कर्मचाऱ्यांचे शोषण करत आहे. हीच परिस्थिती महापालिका आणि नगरपालिकांमधील कंत्राटी व रोजंदारी कामगारांची आहे. त्यामुळे तत्काळ या कामगारांना २०१५ सालच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची मागणी महासंघाने केली आहे. शिवाय मानधनावर कायम स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतनश्रेणी आणि इतर हक्क लागू करण्याचे आवाहन भट यांनी केले आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठे आणि वनखात्यातील रोजंदारी व कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आवाहन महासंघाने केले आहे. तर (प्रतिनिधी)
>सर्व रक्षकांना महामंडळात विनाअट सामावून घेत शासनाची वेतनश्रेणी व इतर अधिकार लागू करा. समान कामास समान वेतन, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, अशा मागण्यांचे निवेदनही महासंघाने सरकारला दिले आहे.