प्रचार साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची धाव
By admin | Published: February 9, 2017 04:08 PM2017-02-09T16:08:48+5:302017-02-09T16:08:48+5:30
दुकाने गजबजली : माघारीनंतर खऱ्या र णधुमाळीला सुरुवात
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला बुधवारपासून (दि.८) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. प्रचार करण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक प्रचार साहित्यविक्रीच्या दुकानांकडे धाव घेतली जात आहे.
महापालिका निवडणुक ीच्या माघारीनंतर प्रचाराला उमदेवारांनी जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारफेऱ्या काढण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रचार साहित्याच्या किमती यंदा वाढल्या असून, शहरातील मेनरोड, अशोकस्तंभ, नाशिकरोड भागातील दुकानांवर गर्दी होऊ लागली आहे. माघारीनंतर अपक्ष उमेदवारांचीदेखील प्रचार साहित्य खरेदीसाठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
टोप्या, मफलर, निवडणूक चिन्ह, झेंडे, पताका, टी-शर्ट, स्टिकर खरेदीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. एकूणच प्रचार साहित्य खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सर्वप्रथम उमेदवारांकडून निवडणूक प्रचार साहित्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे असे सर्वच पक्षांचे साहित्य एकत्र सुखाने नांदत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वच प्रचार साहित्य महागले आहे. विविध निवडणूक चिन्हांचे आगळे प्रकार उपलब्ध झाले आहेत. कागदापासून तर प्लॅस्टिक व मेटलमध्येदेखील बिल्ले, बॅच बाजारात आले आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून प्रचार साहित्य खरेदीसाठी कार्यकर्त्यांची पावले दुकानांकडे वळू लागली आहेत. छाननीनंतर मात्र खरेदीला वेग आला असून माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी प्रचार साहित्य खरेदीवर भर दिला आहे. झेंडे, टोप्या शेकड्यावर तर बॅचेस डझनावर विकले जात आहे.
---
प्रचार साहित्याचे दर...
झेंडे २००० रुपये शेकडा
लहान झेंडे १२०० रुपये शेकडा
साधी मफलर ८०० शेकडा रुपये
टोपी २००० रुपये शेकडा
डेमो इव्हीएम यंत्र ४०० ते ५०० रुपये नग
सॅटिन मफलर २००० शेकडा रुपये
प्लॅस्टिक बॅच ४०० रुपये शेकडा
मेटल बॅच १२०० रुपये शेकडा