बँकेला साखरेचा ताबा घेण्यापासून कामगारांनी रोखले

By Admin | Published: May 7, 2016 01:27 AM2016-05-07T01:27:16+5:302016-05-07T01:27:16+5:30

जिजामाता साखर कारखाना : छावणीचे स्वरुप, धक्काबुक्कीत १ कर्मचारी गंभीर.

Workers stopped the bank from taking possession of sugar | बँकेला साखरेचा ताबा घेण्यापासून कामगारांनी रोखले

बँकेला साखरेचा ताबा घेण्यापासून कामगारांनी रोखले

googlenewsNext

दुसरबीड (बुलडाणा): थकीत कर्जापोटी जिजामाता साखर कारखान्याची १४ हजार १४0 साखरेची पोती ताब्यात घेण्याचा बुलडाणा अर्बन बँकेचा प्रयत्न कामगारांनी ६ मे रोजी हाणून पाडला. कर्मचार्‍यांनी साखरेचे ट्रक रोखल्यामुळे, पोलिस आणि कर्मचार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात १ कर्मचारी गंभीर जखमी झाला. ३ कर्मचारी पाल्यांना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकारामुळे तणाव निर्माण होऊन, घटनास्थळाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.
जिजामाता शुगर्स मिल प्रायव्हेट लिमीटेडने सन २0११ मध्ये बुलडाणा अर्बनकडून १0 कोटी रूपये कर्ज घेतले होते. त्यापैकी जवळपास ५ कोटीचा भरणा केला असून, ५ कोटी रूपये जिजामाता शुगर्स मिलकडे थकीत होते. त्या अनुषंगाने बुलडाणा अर्बनने ६ मे रोजी कर्ज वसुलीसाठी पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त लावून कारखान्यातील जवळपास ५ ट्रक साखर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. कर्ज वसुलीसाठी ही मोहीम रितसर परवानगी घेऊन राबविली जात होती; मात्र कर्मचार्‍यांना माहिती मिळताच त्यांनी कारखानाच्या प्रवेशद्वारावर नारेबाजी करून, विरोध केला. त्यामुळे पोलिस व कर्मचार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात कर्मचारी नुरखाँ पठाण गंभीर जखमी झाल्यामुळे, त्यांना जालना येथे हलविण्यात आले. अन्सार पठाण, अरुण भुसारी, शे.दस्तगीर या तीन कर्मचारी पाल्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. सरपंच छगन खंदारे आणि युवा सेनेचे प्रमुख अविनाश चव्हाण यांनी साखर ताब्यात घेण्याच्या आदेशाची प्रत मागितली असता, नायब तहसिलदार माळी यांनी २0१३ च्या आदेशाची प्रत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान अविनाश चव्हाण यांनी दुरध्वनीद्वारे यासंदर्भात आ.शशिकांत खेडेकर यांच्याशी चर्चा करून, आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न केले. साखर ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दंगल नियंत्रण पथकातील ४0 कर्मचारी, १0 पोलिस अधिकारी, १ डीवायएसपी, २0 महिला पोलिस, तर २0 पुरुष पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता.

पुढील आदेशापर्यंत स्थगिती
कामगार नेते कॉ. राजन चौधरी यांनी साखर काढण्यासंदर्भात प्रखर विरोध करून, अगोदर कर्मचार्‍यांची कारखान्याकडील थकबाकी द्यावी, नंतरच साखरेला हात लावावा, असा पवित्रा घेत अवसायकांची कर्मचार्‍यांच्या थकबाकीबद्दलची भूमिका काय आहे, हे लेखी स्वरुपात द्यावे, अशी मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्ल्याळ, तहसिलदार राजेश सुरडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी, कामगार नेते राजन चौधरी यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत साखर काढण्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ५ ट्रक साखर पुन्हा गोदामात जमा करण्यात आली.

Web Title: Workers stopped the bank from taking possession of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.