कोल्हापुरात कामगार आयुक्तालयावर हल्ला

By admin | Published: July 5, 2016 01:43 AM2016-07-05T01:43:09+5:302016-07-05T01:43:09+5:30

बांधकाम कामगारांची सेवापुस्तके देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’च्या आठवले गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी शाहूपुरी व्यापारी पेठ येथील सहाय्यक

Workers' strike in Kolhapur | कोल्हापुरात कामगार आयुक्तालयावर हल्ला

कोल्हापुरात कामगार आयुक्तालयावर हल्ला

Next

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची सेवापुस्तके देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’च्या आठवले गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी शाहूपुरी व्यापारी पेठ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड केली. यावेळी दोघा कार्यकर्त्यांनी हातामध्ये फावडे व कुदळ घेत कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या अंगावर धाऊन जात धक्काबुक्की केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी भीतीने सैरावैरा बाहेर पळत सुटले. सुमारे अर्ध्या तासांत कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कामगार आयुक्तांच्या केबीनसह कागदपत्रांच्या फायली, लॅपटॉप, स्कॅनर, मॉनिटर, फॅक्स मशीन, लाकडी फर्निचर, टेबल, फॅन, काच, नामफलक, खुर्च्या आदी तीन लाख किमतीचे साहित्य भुईसपाट केले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ‘आरपीआय’च्या २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून बारा जणांना अटक केली. संशयित आरोपी अनिल राजू जाधव (वय ३०), कुमार यल्लाप्पा इंगळे (२७), अशोक तुकाराम घोलप (२५), गुरुनाथ अशोक कांबळे (२४), आण्णा बजरंग डावाळे (३५), अरुण प्रकाश दबडे (२५), सूरज गोरख चव्हाण (२४), राजू प्रकाश कोळेकर (३०), देवदास श्रीहरी नागटिळे (२६), संतोष रामचंद्र कांबळे (२४, सर्व रा. राजेंद्रनगर), राजू दयाप्पा शिंदे (३०, रा. मोरेवाडी, ता. करवीर), भागवत सिद्ध गणेश (३०, रा. शिवाजी पेठ) अशी त्यांची नावे आहेत.
‘आरपीआय’च्या ५०० कार्यकर्त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली होती. त्यापैकी ३७५ कामगारांनी नोंदणी अर्ज भरून एकत्रित ३२ हजार १५० रुपयांचा बँक डीडी भरला होता. यासंबंधी नोंदणी पुस्तकाचे वाटप त्वरित करून पाच हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी दि. २६ एप्रिल २०१६ रोजी कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दिले होते. यावेळी त्यांनी माहिती घेतली असता सन २०१३ पासून ३७५ बांधकाम कामगारांनी सेवापुस्तकाचे नूतनीकरण करून घेतले नसल्याचे दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांना नोंदणी अर्ज दाखल केलेल्या पोहोच पावती दाखविण्याची विनंती केली; परंतु त्या त्यांनी दाखविल्या नाही. दि. २७ जूनला पुन्हा कार्यकर्त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कामगार आयुक्तांची भेट झाली. त्यामुळे कार्यकर्ते कार्यालयातच ठिय्या मारून बसले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दोन दिवसांत कामगार आयुक्तांबरोबर बैठक करून देण्याचे आश्वासन देत कार्यकर्त्यांना माघारी घालविले. आश्वासनाप्रमाणे बैठक न झाल्याने सोमवारी सकाळी संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. (प्रतिनिधी)

आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी अर्ज दाखल केलेली पोहोच नाही. तसेच सन २०१३ पासून यापैकी एकानेही सेवापुस्तकाचे नूतनीकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे ते पाच हजार रुपयांच्या अनुदानास पात्र नसतानाही ते सेवापुस्तक व अनुदानाची मागणी करत आहेत. त्यांनी केलेल्या तोडफोडीची माहिती वरिष्ठांना दिली आहे.
- अनिल गुरव, सहाय्यक कामगार आयुक्त
कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगारांची सेवापुस्तके गहाळ झाली आहेत. ती शोधून देण्यासाठी त्यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. त्यांच्या मागण्यांची पूर्तता वेळीच केली असती तर उद्रेक झाला नसता.
- उत्तम कांबळे, जिल्हाध्यक्ष, आरपीआय, कोल्हापूर

Web Title: Workers' strike in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.