रस्ता ओलांडताना करावी लागतेय कसरत
By Admin | Published: August 27, 2016 01:34 AM2016-08-27T01:34:26+5:302016-08-27T01:34:26+5:30
येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे.
पिंपरी : येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामुळे पादचाऱ्यांनादेखील रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी चौक परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत. दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते. चौकामधील कोंडीची समस्या कमी करण्यासाठी चारही दिशांचे रस्ते प्रशस्त आहेत. तसेच दिवसभर या चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, रिक्षाचालक बेशिस्तपणे रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. बँक आॅफ इंडियासमोर तर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पाच ते सात रिक्षावाले रस्त्यावर बेशिस्तरीत्या वाहने उभी करतात. जादा प्रवासी मिळण्यासाठी त्यांच्यात स्पर्धांच सुरू असते. यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँकेत जाण्यासाठीदेखील रस्ता राहत नाही. दरम्यान, बँकेत येणाऱ्या ग्राहकांनादेखील पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्यामुळे कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच सिग्नल सुटल्यावर पाठीमागून वाहन धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकात विविध राजकीय पक्षांचेदेखील आंदोलन-उपोषण होत असतात. त्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. महापालिकेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. चौकातील पोलीस मात्र या वाहनांवर कारवाई न करता दुचाकीधारकांना अडवून दंड वसुलीत व्यस्त असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
>निगडी प्राधिकरण : मृत्यूचा सापळा
निगडी : चौकातील कोंडी कमी करण्यासाठी प्रशस्त रस्ते करूनदेखील चौकातच बेशिस्तरीत्या वाहने उभे राहत असल्यामुळे टिळक चौकात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे, असे असतानादेखील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टिळक चौकात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. या चौकातील कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलदेखील उभारण्यात आला असून, चौकातील चारही दिशांचे रस्तेदेखील प्रशस्त केले आहेत. मात्र, असे असतानादेखील या प्रशस्त रस्त्यांवर मोटारचालकांसह प्रवासी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे.