रोह्यातील पुलांची कामे रखडली

By admin | Published: March 4, 2017 02:59 AM2017-03-04T02:59:04+5:302017-03-04T02:59:04+5:30

रोहा तालुक्यात पुलांची कामे रखडलेली असून सात वर्षे झाली तरी रोहा अष्टमी पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

The works of the bridge were stopped | रोह्यातील पुलांची कामे रखडली

रोह्यातील पुलांची कामे रखडली

Next

मिलिंद अष्टीवकर,
रोहा- रोहा तालुक्यात पुलांची कामे रखडलेली असून सात वर्षे झाली तरी रोहा अष्टमी पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. तर महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेनंतर दोनच दिवसांनी पावसाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या भातसई पुलाच्या बांधकामाला सात महिने होऊन गेले तरी मुहूर्त काही मिळालेला नाही. रोहा अष्टमी पुलांचे काम मार्गी न लागल्यास यंदाही पावसाळ्यात रोहा अष्टमी शहराचा संपर्क खंडित होणार आहे. तर भातसई पुलाचे काम न झाल्यास रोहा- अलिबाग मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत आहे.
रोहा अष्टमी शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन २०११ मध्ये तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ व पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. दोन वर्षांच्या कालावधीत हे बांधकाम पूर्ण करावयाचे असतानाही या पुलाचे बांधकाम मागील सात वर्षे कासव गतीने सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा बांधकामास मुदतवाढ देण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये हा पूल पूर्ण होणार अशी अंतिम डेडलाइन देण्यात आली होती. ती देऊनही रोहा अष्टमी पुलाचे बांधकाम काही पूर्ण झालेले नाही. मुसळधार पाऊस झाल्यास तसेच भिरा व डोलवहाळ धरणातून पाणी सोडले गेल्यास जुन्या पुलावरून पाणी वाहू लागते. परिणामी रोहा अष्टमी शहराचा संपर्क खंडित होऊन अष्टमी बाजूकडील गावांना याचा मोठा फटका बसतो. अलिबागकडील वाहनांना रेवदंडा मार्गे तर मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कोलाड मार्गे १५ कि.मी. लांब वळसा घेऊन प्रवास करावा लागतो. रोहा औद्योगिक वसाहतीतील सुमारे दोन ते अडीच हजार कर्मचारी, कामगार हे अष्टमी व बाजूकडील गावातून एमआयडीसीत कामावर येत असतात. त्यांनाही याचा मोठा फटका बसतो. अनेकदा नदीला पाणी वाढते, अथवा वाढेल या भीतीने कामगारांना नाहक सुटी घ्यावी लागते. रोहा अष्टमीकरांचे जीवनमान प्रभावित करणाऱ्या,या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणेसह तालुक्याचे राजकीय नेतृत्वही उदासीन असल्याचे दिसून येते. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी कुंडलिका नदीवरील नवीन पूल लोकांच्या सेवेसाठी चालू होणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामध्ये भातसई येथील रोहा-अलिबाग महामार्गावरील छोटे पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नियमित फेरी असलेली रोहा-अलिबाग एसटीची सेवाही दोन महिन्यांहून अधिक काळ या घटनेमुळे बंद राहिली होती. या घटनेला सात महिने उलटूनही अद्याप नवीन पुलाचे काम सुरू झालेले नाही. यामुळे भातसई येथील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार पंडित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन स्थानिक जनतेला दिले होते. या कामासाठी निधीही मंजूर झालेला असून कामाचे कार्यादेश देखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीदेखील अद्याप या मोरीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कोणतीही हालचाल करत असल्याचे दिसून येत नाही.
>रोहा अष्टमी नदीवरील नवीन पूल हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सात वर्षे झाली तरी या पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही. मध्यंतरीच्या काळात तालुक्यात टक्केवारीचे गलिच्छ राजकारण सुरू होते. नेतेगणांना दर्जेदार कामांपेक्षा टक्केवारीतील मलई खाण्यातच अधिक स्वारस्य होते. म्हणूनच ही काही महत्त्वाची बांधकामे रखडली गेली आहेत.
- बाळशेठ खटावकर,
माजी शहरप्रमुख, शिवसेना
>रोहा अष्टमी दरम्यानचा नवीन पूल आणि भातसई येथील वाहून गेलेला छोटा पूल या दोन्ही पुलांमुळे अष्टमीकडील तसेच कुंडलिका नदीच्या पश्चिम खोऱ्यातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान प्रभावित होते आहे. या दोन्ही पुलांचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी बांधकाम खात्याने पूर्ण करावे.
- अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
>अद्याप मोरीलाही सुरुवात नाही
निधी मंजूर झालेला असून कार्यादेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीदेखील अद्याप या मोरीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तीन महिन्यांनंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
भातसई येथील पुलाच्या कामाला ४७.७७ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली असून ठेकेदार एजन्सीला जानेवारी २०१७ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले आहेत. काम पूर्ण करण्याचा कालावधी सहा महिने असून या पुलाचे काम आठवडाभरात चालू करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमी पुलाच्या कामाला रिव्हाइज तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असून पावसाळ्यापूर्वी हा पूल रहदारीसाठी देखील खुला करण्यात येईल.
- एस. बी. ठाकू र, उपविभागीय अभियंता, सा.बां.विभाग

Web Title: The works of the bridge were stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.