'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता- मदन येरावार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:40 PM2017-12-12T19:40:04+5:302017-12-12T19:40:29+5:30
अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.
अमरावती : संत्र्याला बाजारपेठ, प्रतिष्ठा आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची क्षमता असलेला वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल संत्रा उत्पादकांसाठी उघडलेले यशाचे दालनच होय. 'लोकमत'च्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकली, असे प्रतिपादन पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.
१६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे होऊ घातलेल्या या महोत्सवातील अमरावती विभागाच्या सहभागाच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तालयात मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. येरावार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक जी. एच. मानकर, महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी अधीक्षक डी.एच. चवाने, आॅरेंज ग्रोव्हर असोसिएशनचे कार्यकारी संचालक पवनकुमार पवित्रकार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे उपस्थित होते. लोकमतचे इनिशिएटिव्ह असलेल्या या महोत्सवाचे प्रमुख आयोजक यूपीएल समूह आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे.
हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना मी या बैठकीसाठी अमरावतीत उपस्थित झालो, यावरून संत्र्यासंबंधाने शासन किती गंभीर आहे, याची प्रचिती उपस्थितांना यावी, अशी जाणीव ना. येरावार यांनी बैठकीदरम्यान करून दिली. आंब्यात आम्ही बरेच पुढे गेलो. संत्र्याबाबत तशी उंची गाठावयाची आहे. त्यासाठीचेच हे भरीव प्रयत्न आहेत. संत्र्याचे ग्रेडिंंग, ब्रँन्डिग, मार्केटिंग आणि प्रोसेसिंग अशा व्हॅल्यू अॅडिशन करणाºया घटकांद्वारे संत्राउत्पादकांचा विकास साधणे हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागचा आहे. जगाच्या कानाकोपºयात या माध्यमातून नागपुरी संत्री पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह म्हणाले, वायव्य प्रांतातील किन्नो देशभर पोहोचतो. नागपुरी संत्री त्याहून चविष्ट. ती मागे पडू नयेत, यासाठी सुरू करण्यात आलेला हा 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल' उत्पादकांसाठी पर्वणीच ठरेल. एरवी केवळ मेट्रो सिटीजमध्ये बघता येणारा असा महोत्सव दरवर्षी नागपुरातच झाला, तर त्याचा दूरगामी लाभ अमरावती विभागातील संत्रा उत्पादकांना होईल. खरे तर संत्र्याच्या विविध प्रजाती आणि संत्र्यावरील सर्वाधिक कार्य अमरावती जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही 'नागपुरी' नव्हे 'अमरावतीची संत्री' म्हणायला हवी, असा उल्लेख सिंह यांनी केला नि उपस्थितांमधून प्रतिसाद मिळाला.
महाआॅरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले, सर्व फळांच्या विविध जाती आहेत. संत्र्याचीच फक्त 'नागपुरी संत्री' ही एकमेव जात आहे. जादुई चवीच्या या फळातील बियांचे प्रमाण कमी करणे आणि साल अधिक टिकावू करणे, यावर संशोधन होणे अपेक्षित आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. मानकर, संत्रातज्ज्ञ रमेश जिचकार, कृषी समृद्धीचे रविकिरण पाटील, संत्रा उत्पादक संस्था, संत्रा उत्पादक शेतकरी, कृषी महाविद्यालये, उद्यानविद्या महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, संस्था यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला 'वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'बाबत स्लाइड शोच्या माध्यमातून लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे यांनी भूमिका विषद केली.
उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल हाच उद्देश !
संत्र्यावर प्रक्रिया उद्योग ही शासनाची प्राथमिकता आहे. पतंजली समूहाला नागपूरच्या मिहान प्रकल्पात १०० हेक्टर जागा दिली. या ठिकाणी सन २०१८ पर्यंत पाच हजार कोटींपर्यंतचा उद्योग उभा राहणार आहे. संत्र्याचा प्रत्येक घटक कामाचा असल्याने व्हॅल्यू अॅडिशन झालीच पाहिजे. संत्रा उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसावा, हाच या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे ना. येरावार म्हणाले.