‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ची प्रक्रिया लवकरच - जावडेकर
By admin | Published: April 10, 2017 04:28 AM2017-04-10T04:28:01+5:302017-04-10T04:44:09+5:30
देशात २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ उभ्या केल्या जाणार असून केंद्र शासनाकडून लवकरच
पुणे : देशात २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’ उभ्या केल्या जाणार असून केंद्र शासनाकडून लवकरच आॅनलाइन अर्ज मागविले जातील. पण जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्यास किमान २० वर्षे प्रयत्न करावे लागतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे सांगितले.
सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी व असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीतर्फे (एआययू) आयोजित ‘उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचे बदलते स्वरूप’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. वेदप्रकाश आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, आपल्याकडे उत्तम शिक्षकांचा तुटवडा असून केंद्रीय विद्यापीठ आणि आयआयटीसारख्या संस्थांमध्ये सुमारे ४० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. देशात ४० विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी एकच मार्गदर्शक, असे चित्र आहे. ही स्थिती बदलण्यासाठी परदेशात संशोधन करण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे.
नॅशनल डिजिटल लायब्ररीमुळे लाखो पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. हॅकेथॉन स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्रालयांना भेडसावणारे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळण्यासाठी हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी स्थापन केली असून त्याद्वारे २० हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. देशातील विद्यापीठांमधील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असून त्यात वाढ करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रँकिंग प्रक्रियेत बदल
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (एनआयआरएफ) पुढील वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या रँकिंगच्या प्रक्रियेत बदल केले केले जातील, असे जावडेकर यांनी सांगितले.