जगप्रसिद्ध कार्निव्हलला गोव्यात आरंभ, देश-विदेशी पर्यटकांची गर्दी
By Admin | Published: February 25, 2017 06:19 PM2017-02-25T18:19:01+5:302017-02-25T19:31:49+5:30
खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट शनिवारी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली
>सदगुरू पाटील / ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 25 - खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट शनिवारी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली. मांडवी नदीच्या किनारी जमून देश-विदेशातील हजारो पर्यटक ह्या मिरवणुकीचे साक्षीदार बनले.
एकूण 56 चित्ररथ पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी झाले. गोवा पर्यटन विकास महामंडळाने विजेत्यांसाठी सहा लाख रुपयांची बक्षीसे पुरस्कृत केली आहेत. सायंकाळी पणजीतील दिवजा सर्कलकडून कार्निव्हल मिरवणुकीस आरंभ झाला. मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी हिरवा बावटा दाखविला. यावेळी निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कार्निव्हल होत आहे.
गेले अनेक दिवस पणजी शहर विविध अंगांनी सजून कार्निव्हलची प्रतीक्षा करत होते. शनिवारी संगीताच्या तालावर शहरातून निघालेल्या कार्निव्हल मिरवणुकीचा गोमंतकीयांसह देश--विदेशी पर्यटकांनीही आनंद घेतला.
हातात असलेल्या बिअरच्या बाटल्या तोंडाला लावून रस्त्याच्या कडेने गर्दी करून शेकडो विदेशी युवा युवती पर्यटक कार्निव्हलचा आनंद लुटत असल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी एकमेकांना रंग लावून व पिचकाऱ्याही मारून कार्निव्हलचा फिव्हर वाढवला.
गोव्यातील निसर्ग, शेती, पर्यावरण सांभाळून ठेवायला हवे असा संदेश मिरवणुकीतील काही चित्ररथांनी दिला. काहीजणांनी चित्ररथांमधून गोमंतकीयांच्या श्रम संस्कृतीचा व गोंयकारपणाचा व एकूणच गोमंतकीय अस्मितेचा गौरव केला. गोव्यातील लोककला, लोकसंगीत याचे दर्शन घडविणारे तसेच गोव्याच्या कृषी संस्कृतीसह धार्मिक एकोप्याचे महत्त्व अधोरेखित करणारेही आकर्षक व प्रभावी चित्ररथ पहायला मिळाले. डिजीटल व इंटरनेटचा प्रसार करणारा चित्ररथही मिरवणुकीत सहभागी झाला.
विव्हा कार्निव्हल असे म्हणत पणजीवासियांनी व पर्यटकांनीही कार्निव्हलचे आनंदात स्वागत केले. कला अकादमीपर्यंत मिरवणूक गेली. लोकांनी आपल्या सदनिकांच्या गच्चीत राहूनही मिरवणुकीतील दृश्यांचा आनंद घेतला.