जागतिक ओझोन संवर्धन दिन विशेष : ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यांपर्यंतचे छिद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:00 PM2019-09-16T12:00:48+5:302019-09-16T12:09:23+5:30
सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे..
पुणे: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनांचा व धुर ओकणाºया वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यापर्यंतचे छिद्र तयार झाले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे, असे भूशास्त्राच्या अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जगभरात १६ सप्टेबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने ‘लोकमत’ने भूशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधला.
अवकाशात तपांबराच्या वर २० ते ३० किमी मध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत. परंतु, तापमानात वाढ होऊन वातावरणातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चालेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधने आदींमुळे क्लोरो फोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनला छिद्र पडते. ही प्रक्रिया होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे आणि शीत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वाढत्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया जलद गतीने होत आहे.
भूशास्त्राचे अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,आशिया खंडामध्ये ओझोनच्या छिद्राचे प्रमाण ८ ते १० टक्के असून उत्तर धृवाच्या दिशेने गेल्यावर हे प्रमाण ३० टक्के तर अंटरटिकाकडे हे प्रमाण ६० टक्के आहे. वाढत्या एअर कंडिशनर,रेफ्रिजरेटर आणि धूर ओकणाºया वाहनांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला धोका पोहचत आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्त्वचेचे कॅन्सर आणि श्वसनाचे विकार होत आहेत.