विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला फटका
By Admin | Published: November 8, 2016 04:57 AM2016-11-08T04:57:52+5:302016-11-08T04:57:52+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा फटका विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला बसला आहे.
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा फटका विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला बसला आहे. संमेलनाचे अडीच कोटीचे बजेट १ कोटी २० लाखांवर आले आहे. संमेलनाच्या खर्चाबाबत हात आखडता घ्यावा लागूनही तब्बल ४० ते ५० लाख रूपयांची तूट भासत असल्याचे ‘सरहद्द’चे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले.
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यात सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत, या उद्देशाने १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संमेलन अयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या यशस्विततेसाठी केंद्र सरकारने संपूर्ण जबाबदारी घेण्याबरोबरच राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात आर्थिक सहभाग दर्शविला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २५ लाख रूपयांच्या निधीचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. सुरूवातीला अडीच कोटीचे बजेट ठरविण्यात आले होते. पण, आचारसंहितेमुळे ते १ कोटी २० लाखांवर आले आहे. केंद्राकडून संपूर्ण २ कोटीची मदत मिळणार होती. संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत पुणे महानगरपालिका, पंजाब आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे असे छापण्यात आले होते. आचारसंहितेमुळे ते काढण्याची वेळ आली.
संमेलनाच्या खचार्साठी पंजाबी समाजाने पुढाकार घेतला आहे. कॉफी टेबल बुकमधून ५० लाख उभे राहणार आहेत. तरीही अजून ४० ते ५० लाख कमी पडणार आहेत,याविषयी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला पत्र पाठविल्याची माहितीही नहार यांनी दिली. (प्रतिनिधी)