नागपूरच्या सृष्टीची विश्वविक्रमी झेप

By admin | Published: August 24, 2014 01:18 AM2014-08-24T01:18:33+5:302014-08-24T01:18:33+5:30

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सडपातळ बांध्याची चिमुकली झटकन काही इंचीच्या बारखालून शरीराची अलगद झेप घेत सहीसलामत बाहेर पडते... तिची ही थक्क करणारी कामगिरी पाहून

The world record of Nagpur's rise | नागपूरच्या सृष्टीची विश्वविक्रमी झेप

नागपूरच्या सृष्टीची विश्वविक्रमी झेप

Next

लिंबो स्केटिंग लोकमतच्या ‘बेटी बचाव’ मोहिमेचा पुढाकार
नागपूर : डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सडपातळ बांध्याची चिमुकली झटकन काही इंचीच्या बारखालून शरीराची अलगद झेप घेत सहीसलामत बाहेर पडते... तिची ही थक्क करणारी कामगिरी पाहून उपस्थितांचे डोळे दीपून जातात... काहींचे डोळेही पाणावतात... टाळ्यांच्या प्रचंड गजरात या चिमुकलीच्या कामगिरीचे कौतुक होते... दहा वर्षांच्या सृष्टी शर्मा हिने शनिवारी नवी यशोगाथा लिहिली. तिने लिंबो स्केटिंगचा १६.५ सेंटीमीटरची नोंद करीत नव्या विश्वविक्रमाकडे यशस्वी झेपही घेतली. सृष्टीचा हा विक्रम ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदला जाणार आहे.
लोकमततर्फे सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाच्या माध्यमातून ‘बेटी बचाव’मोहिमेअंतर्गत सृष्टीला प्रतिभा सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. सृष्टी देखील विश्वविक्रमाला गवसणी घालण्याच्या निर्धाराने सज्ज झाली. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा उपस्थित होते. या विक्रमाची सत्यता तपासण्यासाठी आणि नोंद घेण्यासाठी अधिकारी वर्गानेही हजेरी लावली होती.
सृष्टी ज्या बार खालून जाणार होती त्या सर्व ११ बारची उंची तंतोतंत मोजण्यात आली. सोबतीला चार कॅमेरे सज्ज होते. झाशी राणी चौकातील माहेश्वरी भवनमध्ये लोकमत कॅम्प्स क्लब, बालविकास मंच आणि सखी मंच सदस्यांसह शेकडो नागरिकांनी सृष्टीचा विक्रम डोळ्यात साठवून घेतला. या ऐतिहासिक कामगिरीचे प्रत्यक्ष साक्षीदार बनले. खा. दर्डा यांनी सृष्टीला कडेवर घेत शाबासकी दिली.
लिंबो स्केटिंग क्रीडा प्रकारात खेळाडू स्केटिंगवर आडव्या बारखालून स्पर्श न करता निघतो. यापूर्वी चेन्नईच्या मॅडविन डेव्हाने जून २०१४ मध्ये नोंदविलेला २३ सेंटिमीटरचा विक्रम मागे टाकण्यासाठी सृष्टीने १९ सेंटीमीटर उंची सहज पार केली. यानंतर १८ सेंटीमीटर, पाठोपाठ १७ सेंटीमीटर आणि लगेचच १६.५ सेंटीमीटरची अतिषय अवघड उंची यशस्वीरित्या पार करताच उपस्थितांच्या आनंदाला उधाण आले. तिची आई शिखा आणि वडील धर्मेंद्र यांनी आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. दहा वर्षांची सृष्टी मॉडर्न स्कूल उमरेडची विद्यार्थिनी आहे. सृष्टीचे वडील वेकोलिच्या उमरेड कार्यालयात वाहनचालक आहेत तर तिची बहिण सिद्धी राष्ट्रीय दर्जाची स्केटर आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The world record of Nagpur's rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.