महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे जागतिक स्वच्छता दिन
By Admin | Published: September 18, 2016 01:56 AM2016-09-18T01:56:32+5:302016-09-18T01:56:32+5:30
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार
मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सागरी किनारे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जागतिक सागर तट स्वच्छता दिनाचे औचित्याने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काशीद समुद्र किनारी दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असून हा किनारा स्वच्छ व सुशोभित करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. मोहीमेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ज्येष्ठ निरु पणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहकार्य मिळवत असंख्य श्री सदस्यांचा सहभाग मिळवला.
स्वछता मोहिमेत काशीद ग्रामस्थ, प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद काशीद, माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून ५० टन कचरा गोळा करण्यात आला. (वार्ताहर)
मोहीम अभियानापुरती मर्यादित राहू नये - तेली
अलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून ही मोहीम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी येथे केले.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हा प्रशासन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे. नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, अलिबाग प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कोस्टगार्ड कंमाडर रणजितकुमार सिंग, तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.