जागतिक चिमणी दिन : काँक्रीटच्या जंगलामुळे मुंबईतून चिमणी उडाली भुर्रऽऽऽ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:03 AM2021-03-20T07:03:24+5:302021-03-20T07:05:04+5:30
बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे.
सचिन लुंगसे -
मुंबई : मुंबई शहरात सिमेंट-काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. या पर्यावरणाचा एक भाग असलेली चिऊताई मुंबईचे उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरांत स्थलांतरित हाेत आहे, असे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे.
भायखळा येथील राणीची बाग, धारावी येथील निसर्गउद्यान, बीकेसी येथील मिठी नदीचा परिसर, आरे कॉलनी, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तसेच भांडुपसह लगतच्या परिसरातील हिरवळ आणि तिवरांच्या परिसरांत चिमण्या आढळून येत असल्या तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाची हानी होत असून, त्याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई झपाट्याने बदलली आहे. बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे.
मुंबईतील चिमण्यांचे स्थलांतर थांबवायचे असेल तर त्यांना आवश्यक अधिवास तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक हिरवळ तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. शिवाय आपण राहतो त्या ठिकाणी चिमण्यांसाठी अन्न देणे, त्यांना पाणी देणे, त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बनविणे, आदी उपाय करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून असे उपाय केले जात आहेत. मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे. ज्या पद्धतीने पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने पर्यावरण संवर्धनासाठी काम झाले पाहिजे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
‘चिमण्यांनी मुंबई साेडली, असे म्हणता येणार नाही’
मुंबई शहरात सुरू असलेले खोदकाम, इतर अनेक बांधकामे, प्रकल्प कामे आणि सातत्याने होणारा आवाज अशा अनेक कारणांमुळे चिमण्या शहरातून उपनगरांत स्थलांतरित होत आहेत किंवा येथील त्यांचे प्रमाण कमी होत आहे. जेथे हिरवळ किंवा झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत, तिकडे चिमण्या वास्तव्यास प्राधान्य देत आहेत. पण याचा अर्थ चिमण्यांनी मुंबई सोडली, असा होत नाही. त्या स्थलांतरित होत आहेत, असे आपण म्हणू शकतो. - विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक
या चिमण्यांनो, परत फिरा...
चिमण्यांनी मुंबईत पुन्हा यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देणे, घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी, घराभोवती छोटी झाडेझुडपे लावणे, दाणा-पाणी ठेवणे गरजेचे आहे.