World Tourism Day - दस्तुरखुद्द देवाचं दैव..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:04 PM2019-09-27T12:04:53+5:302019-09-27T12:54:19+5:30
एकाच देवाचं महात्म्य, थोरपण त्याच्या स्थानानुसार कसं बदलतं आणि का बदलावं ?
- सुकृत करंदीकर -
दैव बदलावं म्हणून माणूस देवाकडे धाव घेतो. पण, साक्षात देवाचं आणि त्याच्या देवळाचंही ‘दैव’ एखादी सटवाई गोंदून ठेवत असावी. '' एखाद्या चौकातली उत्सवी मूर्तीसुद्धा नवसाला पावणारी ठरते. तिच्यापुढची गर्दी हटता हटत नाही आणि दुसरीकडे कलाकौशल्यानं नटलेलं, पुरातन राऊळ कळसाविना शतकानुशतकं दुर्लक्षित राहतं. हे देवाचंसुद्धा दैवच म्हणायचं...''
‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली?’ ही म्हण शाळेतल्या दिवसांत हिंदीच्या तासाला कधीतरी कानी पडली होती. ‘राजा भोजा’ची ती पहिली ओळख. अर्थात म्हणीपुरतीच. हा राजा कोण, कुठला वगैरे खोलात जाण्याची तेव्हा गरज पडली नव्हती. त्यानंतर कितीतरी वर्षांनी अगदी अलीकडं म्हणजे गेल्याच वर्षी पुन्हा एकदा ‘राजा भोज’ समोर आले. एका अधुºया, भग्न निमित्तानं. कामनिमित्त मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळला जावं लागलं होतं. कामाची लगबग संपल्यावर आसपासचा परिसर न्याहाळण्यासाठी वेळ काढायचा, ही माझी नेहमीची सवय. त्याप्रमाणे भोपाळवासीयांशी बोलत गेलो आणि ‘राजा भोज’ पुन:पुन्हा माझ्यासमोर येत गेले. राजा भोज यांची भेट घडणार होती तर...
भोपाळपासून पाऊण तासाच्या गाडीरस्त्यावर भोजपूर आहे. ऑगस्टमधले दिवस होते. छान पाऊस पडून गेल्यानं रस्त्याच्या दुतर्फा ताजी हिरवाई होती. क्षितिजाच्या रेषेवर अधूनमधून दिसणारी खडकाळ टेकाडं एखाद्या चित्राप्रमाणे सौंदर्य वाढवत होती. रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. प्रदूषणमुक्त, स्वच्छ हवा नाकाला जाणवत होती. तो गारवा गालांना हवाहवासा वाटत होता. बत्तीस किलोमीटरचं अंतर गाडीनं अलगद कापलं. राजा भोजाचं गाव कधी आलं ते कळालंही नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी नदी दूरवर दिसली. पाण्यामुळे परिसर किती जिवंत होतो, याची जाणीव पाणी नसल्याशिवाय होत नाही. नदीची ती एक सुरेख चंदेरी रेघ प्रसन्न करणारी होती. भोजपुरातल्या या नदीचं प्राचीन नाव वेत्रवती असल्याचं समजलं. स्थानिकांच्या बोली भाषेत ती ‘बेतवा’ झालीय. आताचं भोजपूर ‘राजाचा गाव’ वाटत नाही. मध्यम उंचीच्या टेकाडांमधली तुरळक वस्ती. बरीचशी जुनी घरं, त्यात नव्यानं झालेली बांधकांम दिसतात या गावात. अर्थातच मुद्दाम वेळ काढून पाहावं असं काहीच नाही. या सगळ्यात लक्ष वेधून घेणारी एकच वास्तू ठळकपणे समोर आली.
बेतवा नदीच्या उजव्या किनाऱ्यावरच्या एका टेकडीवर उभी असलेली अत्यंत भव्य वास्तू गावात शिरल्यापासून जणू आपल्याला हाका मारत सुटते. तिच्या जवळ जावं तसं-तसं तिचं लाल रंगाचं पाषाणी देखणेपण नजरेत भरू लागतं. दोनशे फूट अंतरावरूनही या वास्तूच्या गाभाऱ्याची भव्यता जोखता येते. नितांतसुंदर, प्रशस्त आवाका लक्षात आल्यानंतर कुतूहल आणखी वाढतं. गाभाऱ्याबाहेर नंदीला बसण्यासाठी सुंदर घुमटी बांधलीय. नंदी आला म्हणजे त्याचा स्वामी महादेवाचं लिंग गाभाऱ्यात असणारच, हे ओघानं आलंच. पायऱ्या वेगानं ओलांडत मी गाभाºयाकडे निघालो होतो. गर्दी, गोंगाट काहीच नव्हतं. नैवेद्याच्या दुकानांमध्ये घोंगावणाऱ्या माश्या, नवस फेडण्यासाठीच्या नारळांचे ढिगारे, घुसमटलेले हारतुरे, हावरट पुजाऱ्यांची घाई यातलं काहीच नव्हतं इतक्या भव्य देवळाच्या दारात. दर्शनासाठीही रांगा नव्हत्या. माझ्यासारखी फिरायला आलेली मोजकी मंडळी रेंगाळली होती तिथं. एकांताचा आनंद घेणारी काही जोडपीही दिसली. भोवतालच्या नैसर्गिक सुंदरतेमुळे देवळाच्या आवारातली नीरव शांतता आवडून गेली.
गाभाºयात जाण्यासाठीही पुन्हा आठ-दहा पायऱ्या चढून उंचावर जावं लागतं. देवळाचा अख्खा गाभारा शंकराच्या लिंगानं भरून गेला होता. त्या लिंगाला सामावून घ्यायला तो गाभारा इतका अपुरा पडत होता, की त्याला प्रदक्षिणा घालणाऱ्यांनाही सावरून वाट काढावी लागत होती. एवढं मोठं लिंग उभ्या भारतात म्हणजेच जगातही आढळणार नाही. योनीपट्टीच्या तळापासून लिंगापर्यंतची उंची तब्बल २२ फुटांची आणि पिंडीचा व्यासच १८ फुटांचा आहे. किती भव्य आहे हे शिवलिंग! शिवलिंगावरच्या घुमटाला आधार देण्यासाठी चार कोपºयांत उभारलेल्या गोलाकार स्तंभांची उंची ४० फुटांपेक्षा जास्त. त्यावर कोरीव काम केलेलं घुमटाकार छत. मुस्लिम आक्रमक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासून घुमटाकार बांधणी त्या वेळचा हिंदू समाज सुबकतेनं करत होता, हे त्या भव्य घुमटाकडे पाहिल्यावर लक्षात येतं. गाभाऱ्याचं प्रवेशद्वार उंचंपुरं आणि रुंद, की प्राचीन ग्रीक किंवा रोमन मंदिरांची आठवण व्हावी.
गाभाऱ्यासमोरच्या प्रशस्त पटांगणातून पाहिल्यानंतर मात्र समोरची पोकळी चटकन अंगावर येते. या नितांतसुंदर देवळाला शिखर नाही. शिखराच्या जागचं मोकळं आभाळ डोळ्यावर येतं. चटकन लक्षात येतं, की... अरे, या देवळाला कळस नाही. कोणा आक्रमकानं कापून नेला की काय ? मग बांधणीतली इतर ठिकाणची अपूर्णताही नजरेत येऊ लागते. गाभाºयात देव असूनही देऊळ अपूर्ण असल्याचं जाणवू लागतं. याला देऊळ म्हणावं का? इतक्या अद्वितीय मंदिराचा विध्वंस झालाय की कधी पूर्णच होऊ शकलं नाही ते?
अपूर्णतेच्या लोककथा
अप्रतिम सौष्ठवाची वळसेदार, ओलेती स्त्री संगमरवरात कोरणाऱ्या शिल्पकाराच्या हातून शेवटचा टाका घालताना त्या शिल्पाच्या चाफेकळी नाकाचा टवका उडावा. करारी योद्ध्याचं पीळदार शरीर रेखाटताना कसबी चित्रकाराला त्या चित्राचे डोळे जिवंत करता येऊ नयेत. आसमंत भारून टाकणाऱ्या पहाडी आवाजाच्या गवयाला शेवटचा सूरच गवसू नये. अशीच काहीशी अपूर्णता भोजपुरातल्या शिवालयात दिसली. या अपूर्णतेची कारणं देणाऱ्या लोककथा भोजपुरात ऐकल्या. कोणी म्हणालं, ‘महाभारतातल्या कुंतीला शिवभक्ती करता यावी म्हणून पांडवांनी वनवासात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधून काढलं; पण शिखराचं काम सुरू असतानाच सूर्यनारायण उगवले आणि पांडवांनी काम थांबवलं.’ याच बेतवा (वेत्रवती) नदीच्या तीरावर कुंतीनं कर्णाचा त्याग केला, असंही ऐकायला मिळालं.
तिसरी कथा राजा भोजाच्या संबंधातली. हा राजा भोज सर्वार्थानं संपन्न होता. कला, स्थापत्य आणि विद्येची त्याला कदर होती. त्यानं स्वत:ही विविध विषयांवरची ११ पुस्तकं लिहून ठेवली आहेत म्हणे. कशाचीच ददात नसलेल्या या राजाच्या आयुष्यात एक मोठं दु:ख होतं. त्यापायी तो रोज झुरत चालला होता. राजा भोजाच्या अंगावर कोड होते. सगळे उपाय करून राजा थकला; पण अंगावरचं कोड काही केल्या गेलं नाही. नितळ सुंदरतेसाठी शेवटचा उपाय म्हणून भोजानं देवाची पायरी गाठली. जगातलं सर्वांत मोठं शिवालय बांधण्याचा संकल्प त्यानं सोडला.
वैभवशाली राजानं नेटानं काम सुरू केलं. आख्यायिका अशी सांगितली जाते, की गाभाऱ्यावरच्या कळसाचं काम सुरू असताना छत कोसळलं आणि ते शिवलिंगावर कोसळलं. तब्बल सत्तर टनी वजनाच्या छताच्या अवशेषांमुळे ‘शिवलिंग’चं भंगलं. तेव्हा भंगलेल्या पिंडीतली भेग आजही दिसते. भेगाळलेल्या मूर्त्या-पिंडी हिंदू संस्कृतीत पुजल्या जात नाहीत. अनर्थच घडला म्हणायचा हा. प्रचलित संकेतानुसार हा अपघात अपशकुन ठरला. राजा भोजाचा संकल्प अधुरा राहिला. नितळ त्वचेची त्याची आस पूर्ण होऊ शकली नाही. भोजाला याचा धक्का बसला. त्याच्या आयुष्यात राउळावर कळस चढला नाही. भोजाच्या वंशातल्या पुढच्या राजांनीही या ‘अपशकुनी वास्तू’चं रूपांतर देवळात करण्याचा विचारही केला नाही. जगातली एक भव्य वास्तू पूर्ण होता-होता राहिली.
भोज हा परमारवंशीय राजा. ईसवी सन १०१० ते १०५० हा त्याचा काळ होता. मध्य प्रदेशाच्या या भागात १३३९ पर्यंत परमारवंशीयांची सत्ता होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर माळवा प्रांत मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात गेला. भोजपूरचं अपूर्ण शिवमंदिर विस्मरणात गेलं. भग्नावस्थेकडे झुकलं. राजा बदलला. राजशकट बदललं. दहाव्या शतकातलं दगड सौंदर्य आणखी मुकं झालं.
'दर्दी’ भाविकांचा देव
भोजपुरातल्या शिवलिंगाची कथा ही अशी हुरहुर लावणारी. या तुलनेत उज्जैनमधले देव भलतेच नशिबवान म्हणायचे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं उज्जैन प्राचीन शहर. कालिदासाच्या मेघदुतात उज्जैनचं वर्णन आहे. विक्रमादित्याचं उज्जैन तसं मंदिरांच गाव. पाहावं तिकडं देवळं. या सर्वात लोकप्रिय आहे ते महाकालेश्र्वराचे देऊळ. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक म्हणून याचे स्थान माहात्म जास्त आहे. साहजिकपणे इथे भाविकांचा अखंड ओघ असतो. या महाकालेश्र्वराला चक्क भांगेचा नैवेद्य दाखवला जातो. देवळाच्या बाहेरच भांग घोटणारी दुकानं थाटली आहेत. महाकालेश्र्वराच्या नावानं भक्त भांगेत ‘तल्लीन’ होतात. या भक्तीरसातलं डुंबणं पुरेसं पडत नसावं म्हणून की काय आणखी ‘दर्दी’ भक्तांसाठी पुढची सोयसुद्धा उज्जैन परिसरातच आहे.
उज्जैनची वेस ओलांडून थोडं बाहेर पडलं की काळभैरवनाथाचं देऊळ समोर येतं. ‘दर्दी’ भाविक याचं दर्शन चुकवूच शकत नाहीत. कालभैरवनाथ म्हणजे योद्धा. दैवांच्या सैन्याचा सेनापती. त्याच्या गाभाऱ्याबाहेर श्वान उभा दाखवलाय. दुष्टांच्या निर्दालनासाठी हिंसा करायला काळभैरवनाथ पुढे-मागे पाहात नाही. रक्ता-मांसाचा चिखल त्याला त्याज्य नाही. या प्रचंड रक्तंबबाळ कार्यात मग्न असताना चित्त विचलित होऊ नये म्हणून काळभैरवनाथाला मद्याचा आधार लागतो. या मद्याची सोय भक्तांनी नाही तर कोणी करायची ? बिचारे भाविक मोठ्या श्रद्धेने काळभैरवनाथाला मद्याचा प्रसाद अर्पण करतात. भाविकाची आर्थिक ताकद जशी त्याप्रमाणे प्रसादाची गुणवत्ता ठरते. देवळाबाहेरच नारळ-फुलांबरोबर देशी-विदेशी, स्कॉच-व्हिस्की वगैरे विकत घेण्याची सोय आहे. पण देवळात गेल्यावर दुजाभाव नाही. भक्ताने आणलेली बाटली पुजारी लगेच फोडतो आणि स्वयंभू काळभैरवनाथाच्या तोंडाला लावतो. भक्त धन्य पावतो. तो आणखी तल्लीन व्हावा म्हणून पुजारी उरलेली अर्धी बाटली त्याला परत करतो. गाभाऱ्याजवळच घमघमाट सुटलेला असतो. मन प्रसन्न...नव्हे गुंग होऊन जाते.
स्वतःचं भाग्य बदलून घेण्यासाठी देवाच्या दारात जाणारा माणूस देवाच्या आवडीनिवडी ठरवतो. स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी देवाला वेठीला धरतो. एकाच देवाचं महात्म्य, थोरपण त्याच्या स्थानानुसार कसं बदलतं आणि का बदलावं ? भोजपुरच्या शिवालयाचा भाग्योदय कधीच होऊ शकला नाही. स्मशानवैराग्याचा स्वामी असलेल्या महादेवाच्या नशिबी भोजपुरच्या राऊळात स्मशानशांतता येते आणि तोच महादेव उज्जैनमध्ये महाकालेश्र्वर झाला की त्याच्या नावानं भांगेचे प्याले रिते होतात. काळभैरवनाथाला मद्य चाखवले जाते. देवाचंही दैव घडवतो की माणूस.