जगात तिसरं महायुद्ध, भारतावर ३ राष्ट्रांचं आक्रमण होईल, अन्...; संत बाळुमामांची भाकणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:46 PM2022-03-29T16:46:05+5:302022-03-29T17:01:15+5:30
नदीकाठची जमीन ओसाड होईल. कर्नाटकातील जलाशयातला मोठं भगदाड पडेल अशीही भाकणूक करण्यात आली आहे.
बाजीराव जठार
कोल्हापूर – श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळुमामा भंडारा उत्सावाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात दरवर्षी भाकणूक कार्यक्रमात भविष्यवाणी केली जाते. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने भविष्यात काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. या भाकणुकीत रशिया-यूक्रेन युद्धासोबतच जगाला तिसरे महायुद्ध होईल. अनेक राष्ट्र एकमेकांशी लढत भाग काबीज करण्याचा प्रयत्न करतील. भारतावरही तीन राष्ट्र आक्रमण करतील अशी भविष्यवाणी भाकणूकमध्ये करण्यात आली आहे.
या भाकणुकीत सांगण्यात आले की, चीन, कोरियासारखे राष्ट्र जगासाठी घातक ठरतील. भारत-पाकिस्तान युद्ध होईल. परंतु भारतीय सैन्य देशाचं रक्षण करतील. परकीयांचे हल्ले परतावून लावतील असं सांगण्यात आले. आदमापूर येथील बाळूमामांच्या भंडारा यात्रेत कृष्णात डोणे यांनी भाकणूक केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा देवालयात जागरानिमित्य पहाटे झालेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक, भाकणूक करण्यात आली.
ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बाळूमामांच्या बकऱ्यातील मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. त्याची कीर्ती संपूर्ण जगात होईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल. मायेचे लेकरु मायेला ओळखायचे नाही. चालता बोलता मनुष्याला मरण येईल. माझं माझं म्हणू नका.जगातील राष्ट्रे लढाई करतील,तिसरं महायुद्ध होईल,भारत पाकिस्तान यांचं छुप युद्ध होईल असंही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.
तसेच चीन राष्ट्र भारतावर आक्रमक करील. भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. माणसाला माणूस खाऊन टाकील. महागाईचा आगडोंब उसळेल. सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्ह पडेल. नदीकाठची जमीन ओसाड होईल. कर्नाटकातील जलाशयातला मोठं भगदाड पडेल. गर्वाने वागू नका. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभले. हा सगळा मायेचा बाजार आहे. निती धर्माला अनुसरुन वागा. सुखात ठेवीन असंही भाकणूकमध्ये सांगण्यात आले आहे.