१२० महिला चित्रकारांनी साकारले जगातले सर्वात मोठे वारली चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:09 AM2023-02-21T07:09:20+5:302023-02-21T07:09:41+5:30
जी-२० मध्ये पालघरच्या ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकारांचीही कलाकारी
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : जी-२० परिषदेनिमित्त औरंगाबाद महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने ४५६ फूट लांब आणि ७ फूट उंच अशा ३२०० चौरस मीटरच्या भिंतीवर ‘वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग’ चितारण्यात आली आहे. त्याकरिता पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकार औरंगाबाद येथे गेल्या होत्या. शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी या शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते महावीर चौक रस्त्यावरील एसटी कार्यशाळेच्या भिंतीवर १२० महिला चित्रकारांनी जगातील सर्वांत मोठे वारली चित्र सहा तासांत काढून विश्वविक्रमाला गवसणी घातली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पालघर येथील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या कीर्ती नीलेश वरठा यांना १५ फेब्रुवारी रोजी एका एनजीओच्या माध्यमातून दूरध्वनीवरून या संकल्पनेची माहिती देण्यात आली, मात्र वारली पेंटिंग ही आमची ऑथेन्टिक असून त्याचे जीआय रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगून तुम्ही ती पेंटिंग या पद्धतीने काढू शकत नसल्याचे कीर्ती यांनी समजावले. वारली पेंटिंगचा व्यापार किंवा क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या ग्रुपच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही कलाकृती पूर्ण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कीर्ती यांनी तो मान्य करून वारली पेंटिंग असलेली छायाचित्रे आयोजकांना पाठवली, मात्र ही पेंटिंग या ग्रुपच्या सूचनेनुसार काढावी, अशी अट घातली.
ती मान्य झाल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील कीर्ती वरठा (पालघर माहीम), पूनम कोल (डहाणू वाकी), राजेश्री गोलीम (पालघर नीहे), तारा बोंबाडे (पालघर आदिवासी नाका), तनया उराडे (केळवा रोठे), शालिनी कासट (पालघर) या सहा महिला वारली चित्रकार औरंगाबादला दाखल झाल्या. १७ फेब्रुवारीला स्थानिक १२० मुलींसह सकाळी १० वाजता या ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली चित्र काढण्यास प्रारंभ झाला. या पेंटिंगमध्ये वारली महिलेचे लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक पद्धतीने दैनंदिन जीवन दाखविण्यात
आले आहे.
आदिवासींचे संपूर्ण जीवन
आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, समाजाचे पारंपरिक नृत्य, राहणीमान, सण-उत्सव, जल-जंगल-जमिनीशी जुळलेली नाळ इ. लहानसहान बाबींना चित्रात स्थान देण्यात आले आहे. ही पेंटिंग नसून वारली लिपी असल्याचे या महिला वारली चित्रकारांनी उपस्थितांना सांगितले. आदिवासींची जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारल्यास पर्यावरणाचा जटील प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या समाजाच्या पारंपरिक कलेचा विश्वविक्रम नोंदला गेला, त्याला आपला हातभार लागल्याने या सहाही महिला चित्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.