जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!

By Admin | Published: May 16, 2016 05:10 AM2016-05-16T05:10:21+5:302016-05-16T05:10:21+5:30

फुलाचे ४ प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाट व जीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत.

The world's most beautiful flowers in Sahyadri ranges! | जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!

जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!

googlenewsNext

अशोक खरात,

खोडद (जि. पुणे)- आपल्या आजूबाजूला गुलाब, मोगरा, जाईजुई अशी किती तरी सुंदर फुलं आहेत. पण आॅर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलाचा मान मिळालेला आहे. या फुलाचे ४ प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाट व जीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत.
आॅर्किड्सची फुलांची मोठी गंमत म्हणजे ही फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. ही फुले एवढी मनमोहक असतात की, कोणीही सहज आकर्षित होतं.
खोडद (ता. जुन्नर) येथील वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले की काही आॅर्किड्स काही मीटरपर्यंत वाढतात. याउलट वृक्षांच्या खोडात वाढणारी आॅर्किड्स दरवर्षी नवीन जन्म घेतात. एकदा वाढलेली फांदी प्रजननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळून पडते. नवीन वर्षी नव्या फांद्या फुटतात. यामध्येदेखील मुळांच्या रूपानं आॅर्किड निसर्गात मुक्त श्वास घेत असतं.
झाडांच्या खोडांत वाढणारी आॅर्किड्स ही बहुधा या प्रकारातील असतात, म्हणजेच ते कुठल्या तरी वृक्षांच्या फांद्यांवर किंवा खोडांत वाढतात. पण अन्नद्रव्यांसाठी ते त्यावर अवलंबून नसतात.
फुलाची दांडी ही १८० कोनामध्ये वळलेली असते. अर्थात हे आपण वरवर पाहताना लक्षात येत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे आॅर्किडच्या बिया अतिशय सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे नुसत्या डोळ्यांनी न दिसण्याइतक्या सूक्ष्म असतात. त्यासाठी सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो, असेही डोंगरे यांनी सांगितले.
>एकट्या आॅर्किड या कुळामध्ये ८८० जाती आणि २७,८०० प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय नवीन प्रजातींवर जगभर संशोधन सुरू आहे. आॅर्किड्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. जमिनीवर वाढणारे आणि वृक्षांच्या खोडांमध्ये किंवा फांद्यांवर वाढणारे. यातील जमिनीवर वाढणाऱ्या आॅर्किड्समध्ये मुळांची जागा छोट्या बटाट्यासारख्या मुळाने घेतलेली असते. या बटाट्यांमधून पुढे वेगवेगळे कोंब फुटतात आणि वाढतात. नवीन कोंबावर फुले लागतात. पुढे परिपक्व होऊन फळे आणि बीजप्रसार होतो. हे चक्र पूर्ण झालं, की हाच जुना कोंब पुढे वाढून नव्याने पुन्हा तेच चक्र सुरू होतं.
- राजकुमार डोंगरे, वनस्पती अभ्यासक

Web Title: The world's most beautiful flowers in Sahyadri ranges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.