जगातील सर्वांत उंच इमारत मुंबईत होणार

By admin | Published: November 1, 2015 03:13 AM2015-11-01T03:13:27+5:302015-11-01T03:13:27+5:30

दुबईमधल्या बुर्ज खलिफा या इमारतीपेक्षा उंच, म्हणजे जगातली सगळ्यात उंच इमारत मुंबईमध्ये बांधण्याचे माझे स्वप्न आहे. या इमारतीचे नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हेन्शन सेंटर.

The world's tallest building will be built in Mumbai | जगातील सर्वांत उंच इमारत मुंबईत होणार

जगातील सर्वांत उंच इमारत मुंबईत होणार

Next

दुबईमधल्या बुर्ज खलिफा या इमारतीपेक्षा उंच, म्हणजे जगातली सगळ्यात उंच इमारत मुंबईमध्ये बांधण्याचे माझे स्वप्न आहे. या इमारतीचे नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हेन्शन सेंटर. इमारतीचे वरचे तीस मजले रेस्टॉरंट्स असतील, त्याखालील तीस मजल्यांवर सर्व सुखसोयींनी युक्त अशी हॉटेल्स असतील, काही मजले व्यावसायिक आस्थापनांचे असतील आणि जवळपास १५ हजार गाड्यांसाठी पार्किंग स्पेस असेल, हे भव्य चित्र रंगवले आहे मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे प्रत्यक्षात उरवणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी. आपल्या या स्वप्नाला केवळ स्वप्नात ठेवले नसून अनेक जणांचा समावेश असलेली टीम हा प्रस्ताव सत्यात उतरविण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करीत असल्याचेही गडकरी म्हणाले.

आयबीएन-लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी उगाच गैरअर्थ काढू नका, मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि मुंबई ही कायम महाराष्ट्रातच राहणार आहे, असे सांगत मुंबईचा आता वेगळा विचार व्हायला हवा अशी गरज व्यक्त केली. मुंबईला जर आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो आणि ती भव्य असायला हवी असे आपल्याला वाटत असेल तर वेगळा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. याबाबत आपली भूमिका मांडताना गडकरींनी मुंबईला देता येणे शक्य असलेल्या पायाभूत सुविधांची क्षमता संपत आल्याकडे लक्ष वेधले. मुंबईमध्ये जागेचा प्रश्न तीव्र असल्याचे सांगताना, भावनिक न होता, मुंबईमध्ये उद्योगांची गरज आहे का याचा विचार व्हायला हवा, असेही सांगितले.
मुंबईतल्या तीन बड्या सरकारी कंपन्या मुंबईबाहेर, पण महाराष्ट्रातच - गुजरातमध्ये नाही - स्थलांतरित करण्याचा आपला प्रस्ताव असल्याचेही या वेळी गडकरींनी स्पष्ट केले. राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स (आरसीएफ), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) या कंपन्यांचे मुंबईमध्ये प्रचंड मोठे प्रकल्प आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात जमीन आहे. या कंपन्या सिंधुदुर्गात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मी संबंधित खात्याकडे पाठवला असल्याचे या वेळी गडकरींनी सांगितले.
सिंधुदुर्गामध्ये जर हे प्रकल्प गेले तर त्या संपूर्ण भागाच्या विकासाला चालना मिळेल, त्या परिसराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करता येईल आणि शेकडो स्थानिक मराठी माणसांना रोजगार मिळेल, असे गडकरी म्हणाले. मुंबईमध्ये अशा रीतीने मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकते, तिचा वापर मुंबई भव्य दिव्य करण्यासाठी व जगाचे आकर्षण ठरण्यासाठी होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.
मुंबईला भव्य बनवायचे तर केवळ मुंबईतल्या पायाभूत सुविधा नाहीत, तर मुंबईच्या अन्य शहरांशी असलेल्या कनेक्टिव्हिटीचाही विचार करावा लागेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे बांधताना माझ्या डोळ्यांसमोर ४ एक्स्प्रेस-वे होते, असे गडकरी म्हणाले. ते राहिलेले काम आता आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगताना या वर्षाअखेरीपर्यंत २० हजार कोटी रुपयांच्या मुंबई - बडोदा एक्स्प्रेस-वेच्या निविदा निघतील आणि पुढच्या वर्षी कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबई - नागपूर एक्स्प्रेस-वेचा प्रस्तावही आपण तयार करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

जगातील उंच इमारती...
बुर्ज खलिफा
828 मीटर उंची दुबईमधील सध्याचे महत्त्वाचे आकर्षण
२००४ ते २००९ बांधकामाचा काळ
यूएईच्या अध्यक्षांच्या
नावे बांधलेली इमारत. पर्यटकांचे आवडते स्थान

शांघाय टॉवर
632मीटर शांघाय वर्ल्ड फायनान्शिअल सेंटर
२००८ ते २०१५ बांधकामाचा काळ
2.4 अब्ज डॉलर्सचा खर्च

मक्का रॉयल क्लॉक
601मीटर या इमारतीस ‘अब्राज अलबेट’ असेही नाव आहे. ही मक्का येथे आहे.
२००४-२०१५ बांधकामाचा काळ
सौदीच्या सौैदी बिन लादेन समूहाने बांधकाम केले.

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर
541मीटर डब्ल्यूटीसी असेही नाव. ही
न्यू यॉर्क येथे आहे.
२००६-२०१३ बांधकामाचा काळ
३.९ अब्ज डॉलर्सचा खर्च

सीटीएफ फायनान्स
530मीटर चीनमधील ग्वान्झाऊ शहरामध्ये आहे.
या इमारतीत घरे, कार्यालये आणि हॉटेल्स आहेत.
२०१० ते २०१६ बांधकाम काळ

 

Web Title: The world's tallest building will be built in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.