जगातील सर्वांत लठ्ठ महिला आज मुंबईत दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 03:07 AM2017-02-11T03:07:14+5:302017-02-11T03:09:51+5:30
जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद शनिवारी सकाळी मुंबईत येणार आहे. इजिप्त येथे राहणाऱ्या इमान यांचे वजन ५०० किलो आहे.
मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद शनिवारी सकाळी मुंबईत येणार आहे. इजिप्त येथे राहणाऱ्या इमान यांचे वजन ५०० किलो आहे. अति लठ्ठपणामुळे गेल्या काही वर्षांपासून बिछान्याला खिळून असलेल्या इमान वजन कमी करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येत आहेत. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करणार आहेत.
एअरबसच्या विशेष विमानाने ३६ वर्षीय इमान अहमद यांना मुंबईत आणण्यात येत आहे. त्यांच्या शरीराचे आकारमान आणि वजनामुळे त्यांना घेऊन येण्यासाठी विमानामध्येही काही बदल करण्यात आले आहेत. डॉ. अर्पणा भास्कर, डॉ. कमलेश बोहरा आणि इमान यांची बहीण शायमा अहमद हे त्यांच्यासोबत असतील.
या शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून, तेथे एक आॅपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम आहे. ७ फूट रुंद दरवाजे असून, बेडदेखील ७ फूट रुंद आहे. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्यासोबत विशेष चमू उपस्थित राहणार असून, शस्त्रक्रियेनंतर इमामला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुंबईत राहावे लागणार आहे.