विश्वशांती पर्वाचे नेतृत्व भारताकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 02:17 AM2016-11-10T02:17:17+5:302016-11-10T02:17:17+5:30
पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे
पुणे : पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे’, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय विश्वशांती परिषदेचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुकुल ज्ञान उपासक संघाचे अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, माजी पर्यटनमंत्री चंद्रकांत छाजेड, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते. सबनीस यांच्या हस्ते ‘नॅशनल डायस आॅफ लिटरेचर’ या व्यासपीठाचे उद्घाटनही करण्यात आले.
सबनीस म्हणाले, ‘पैगंबरांचा खरा इस्लाम आणि दहशतवाद्यांचा खोटा इस्लाम यामध्ये संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत पैगंबरांचा समतावादी आणि शांततावादी इस्लाम भारताला जवळचा आहे. भारतातील हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन बगदादीला विरोध करणे आवश्यक आहे.
विश्वशांती नांदली तरच प्रत्येक देशाला मूलभूत गरजा सोडवता येतील आणि त्याचसाठी पंतप्रधानांची १०० देशांच्या संपर्काची घोडदौड सुरू आहे.’ सायली गिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत गुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)