गिधाड संवर्धनाची दखल जागतिक स्तरावर
By Admin | Published: October 3, 2016 03:19 AM2016-10-03T03:19:30+5:302016-10-03T03:19:30+5:30
सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाडांचे संवर्धन करण्यात येत आहे.
महाड : महाडच्या प्रेमसागर मेस्त्री या निसर्ग आणि ध्येयवेड्या तरुणाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाडांचे संवर्धन करण्यात येत आहे. सिस्केपच्या कामाची दखल जागतिक स्तरावरील निसर्गप्रेमींनी घेतली आहे. संस्थेने महाडचे नाव जगाच्या नकाशावर कोरले याचा आपल्याला सार्थ अभिमान असून या संस्थेच्या कामाची दखल केंद्र व राज्य सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केली.
सिस्केप संस्थेतर्फे १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर, सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, वनक्षेत्रपाल मच्छिंद्र देवरे, युवा नेते हनुमंत जगताप, रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ, आदि उपस्थित होते. यावेळी माणिक जगताप यांनी सिस्केप या संस्थेला वैयक्तिक पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
जगताप म्हणाले, की सिस्केपने सुरू केलेल्या चिरगाव येथील गिधाड संवर्धन केंद्राला ३४ देशातील प्राणिमित्र भेट देवून सिस्केपचे कौतुक केले आहे. मात्र या संस्थेला शासन कुठलेही सहकार्य करीत नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. सिस्के पला शासनाने सहकार्य करावे, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून यासाठी शासनाच्या वनविभागाला आर्थिक तरतूद करण्याची विनंती करणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
संस्थेला महाड नगरपरिषदेकडून दरवर्षी अनुदान देण्याच्या सूचना नगराध्यक्षांना त्यांनी यावेळी दिल्या. प्रेमसागर मेस्त्री यांनी सिस्केपच्या कामाचा आढावा घेताना अत्यंत प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात संस्थेला पर्यावरणाचे संवर्धनासाठी धडपड करावी लागत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पक्षी संवर्धनासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
>फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह
आगरदांडा : मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताहाचे साजरा करण्यात आले आहे. या निमित्ताने फणसाड वन्यजीव व प्रशासनातर्फेप्रचार व प्रसिद्धी व्हावी या अनुषंगाने जनजागृती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्र माचे उद्घाटन व अध्यक्ष अॅड. संजय जोशी यांच्या हस्ते झाले. सप्ताह आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात असून संपूर्ण वन्यजीव या विषयावर माहिती देण्यात येईल. यासाठी क्षेत्रीय कर्मचारी परिसरातील शाळांमधून फणसाड अभयारण्याची अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी निसर्ग सहल आयोजित केली होती.