विद्यापीठात झाडे बोलणार जगभरातील भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 07:21 PM2018-08-23T19:21:15+5:302018-08-23T19:34:20+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आवारात जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या भाषा ऐकता येणार आहेत.
पुणे : जगभरातील सहा हजारांहून अधिक भाषा झाडांच्या माध्यमातून बोलत्या करण्याची किमया पुण्यात साधली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आवारात जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या भाषा ऐकता येणार आहेत. पुण्यामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या लेखकांच्या पेन आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त या उद्यानाची संकल्पना पुढे आली आहे.
जगभरातील लेखक, संपादक, साहित्यिक यांची प्रतिष्ठित संघटना असलेल्या पेन इंटरनॅशनलची वार्षिक परिषद यंदा पहिल्यांदाच भारतात भरणार आहे. ही परिषद भरविण्याची संधी पुणे शहराला मिळाली असून दि. २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या ८४ व्या परिषदेसाठी विद्यापीठ बौध्दिक भागीदार असेल. या परिषदेची माहिती मुख्य समन्वयक व भाषा संशोधक डॉ. गणेश देवी व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे व स्थानिक स्वागत समितीचे अध्यक्ष सचिन इटकर उपस्थित होते.
परिषदेत जगभरातील सुमारे ८० देशांमधून १८० तर भारतातील सुमारे ४०० लेखक, भाषातज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्यानिमित्त विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आवारात विविध प्रकारची १८० झाडे परदेशी लेखकांच्या हस्ते लावण्यात येतील. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक झाडाला सेन्सर बसविले जातील. या सेन्सरद्वारे नागरिकांना विविध भाषांमधील कविता, लेखन, संवाद, ठिकाणांची माहिती ऐकायला मिळेल. भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल. सुमारे ६ हजार भाषांचे संकलन केले जाणार असून प्रत्येक झाड सुमारे ७० ते ७५ भाषा बोलेल. या अभिनव उद्यानाची सुरूवात दि. २८ सप्टेंबरला होणार असून दि. ३० जानेवारी २०१८ पासून ते खुले केले जाईल. पेन साऊथ इंडिया व विद्यापीठाकडून या उद्यानासाठी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. गणेश देवी यांनी दिली.
दरम्यान, परिषदेमध्ये पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील साहित्यिकांचा विविध २५ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये संवादाचा कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम अन्य महाविद्यालयांमध्ये लाईव्ह दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. विद्यापीठामध्ये दि. २७ व २८ सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहेत, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
....................
सहा हजार भाषांची दिंडी
परिषदेमध्ये सुमारे सहा हजार भाषांची दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीचे नेतृत्व मराठी भाषा करणार आहे. ही अनोखी दिंडी दि. २८ सप्टेंबरला दुपारी २ ते ५ या वेळेत निघेल. सर्व लेखक, भाषातज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे नेहरू सांस्कृतिक भवन येथे भारतीय कलांचे प्रदर्शन, विद्यापीठ व आगाखान पॅलेस येथे नाटके, भारतीय भाषांवर चर्चासत्र, आगाखान पॅलेस येथे भेट, केनिया येथील एन. गुगी यांच्यासह कवी अशोक वाजपेयी तसेच काही निवडक प्रसिध्द लेखकांची व्याख्याने, परदेशी तसेच भारतीय कवींचे एकत्रित कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम परिषदेत होणार आहेत.
................................
शंभर पुस्तकांचा अनुवाद
जगभरातील विविध भाषांमधील प्रसिध्द १०० पुस्तकांचा भारतीय भाषांमध्ये तर भारतातील प्रसिध्द १०० पुस्तकांचा जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्याबाबत परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. या चचेर्नंतर पुस्तकांची निवड, भाषांमधील अनुवादाबाबत निश्चिती होईल, अशी माहिती डॉ. गणेश देवी यांनी दिली.