वरळीत पोलिसाच्या अंगावर गाडी घातली
By admin | Published: September 9, 2016 05:37 AM2016-09-09T05:37:40+5:302016-09-09T05:37:40+5:30
पोलिसांशी सौजन्याने वागा, दादागिरी केल्यास जन्माची अद्दल घडवू, असा इशारा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिल्यानंतरही खाकीवरील हल्ल्याचे सत्र सुरूच असून
मुंबई : पोलिसांशी सौजन्याने वागा, दादागिरी केल्यास जन्माची अद्दल घडवू, असा इशारा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिल्यानंतरही खाकीवरील हल्ल्याचे सत्र सुरूच असून, गुरुवारी वरळीमध्ये एका अल्पवयीन दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. पोलीस शिपाई दीपक निकाळजे (४५) हे यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई निकाळजे हे गुरुवारी त्यांच्या सहकाऱ्यांसह वरळी नाका येथे नाकाबंदीसाठी तैनात होते. याच मार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या अल्पवयीन दुचाकी स्वाराला पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र दुचाकीस्वार पळून जात असल्याचे निकाळजे यांच्या लक्षात आले. त्यांनी या दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने निकाळजे यांच्या अंगावर गाडी घातली. दुचाकीची जोरात धडक बसल्याने निकाळजे रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
नाकाबंदीसाठी असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेत, जखमी अवस्थेतील निकाळजे यांना उपचारासाठी जवळच्या पोद्दार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणासह दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन असताना मुलाकडे दुचाकी चालविण्यास दिल्याने याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराचे वडील हमीद वाघू आणि आई झुलेखा हमीद वाघू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाघू कुटुंबीय वरळी परिसरात राहतात.