राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:59 PM2024-11-23T19:59:14+5:302024-11-23T20:01:27+5:30
Worli Assembly Election 2024 Result Updates: लोकसभेला मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते, परंतू उद्धव ठाकरेंनी ते न दिल्याने देवरा शिंदे गटात गेले होते. हेच देवरा विधानसभेला आदित्य ठाकरेंसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले होते.
Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेली निवडणूक काँग्रेसचे उरलेले गडही उध्वस्त करून गेली आहे. महायुती, मविआ, महाशक्ती, मनसे, अपक्ष अशा लढ्यात अनेकांचे गड गेले, वाचले आहेत. अशाच बहुरंगी लढतीचा थेट फायदा आदित्य ठाकरेंना झाला आहे. गेल्यावेळी राज ठाकरेंनीआदित्य ठाकरेंना थेट पाठिंबा दिला होता, तर आताही राज ठाकरेच कळत-नकळत आदित्य ठाकरेंच्या मदतीला आले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने माहिममध्ये विजय प्राप्त केला आहे. तिथे राज ठाकरेंनी पूत्र अमित ठाकरेंना उभे केले होते. सदा सरवणकर आणि अमित ठाकरे अशीच ही निवडणूक रंगली होती. यात दोघेही पराभूत झाले तर ठाकरे गटाचे महेश सावंत जिंकले आहेत. इकडे वरळीतही शिंदे गटाने आदित्य ठाकरेंची आमदारकी घालविण्याची पूर्ण तयारी केली होती, परंतू भाजपा-महायुतीकडे जाऊ शकणारी मनसेची मते मनसे उमेदवाराने घेतल्याने अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंना मोठी मदत झाली आहे.
लोकसभेला मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते, परंतू उद्धव ठाकरेंनी ते न दिल्याने देवरा शिंदे गटात गेले होते. हेच देवरा विधानसभेला आदित्य ठाकरेंसमोर आव्हान घेऊन उभे ठाकले होते. लोकसभेला मनसेने भाजपाला पाठिंबा दिला होता. परंतू विधानसभेला राज यांनी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यात महिममध्ये शिंदे गटाने माघार न घेतल्याने पुढचे सर्व एकमेकांना मदतीचे मार्ग बंद झाले होते.
आदित्य ठाकरेंना वरळीत देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना टक्कर द्यायची होती. परंतू देशपांडे यांनी 18,858 मते घेतल्याने देवरांचा खेळ बिघडला आणि आदित्य ठाकरेंचा 8,000 मतांनी विजय झाला. आदित्य यांनी 60,606 मते घेतली तर देवरा यांना 52,198 मते मिळाली. मनसे उमेदवार नसता तर मतांचा खेळ काही वेगळाच रंगला असता. अप्रत्यक्ष रित्या राज यांनी आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचविली आहे.