आंबा प्रेमींसाठी चिंतेची बातमी! यंदा अवघे २५ टक्केच आंबा उत्पादन होणार, खिसे मोकळे करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:11 IST2025-02-24T10:11:39+5:302025-02-24T10:11:51+5:30
गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आंबा पेटी मुंबई तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्रीला आली होती. यावर्षी फेब्रुवारीत आंबा आला, परंतु प्रमाण अत्यल्प आहे.

आंबा प्रेमींसाठी चिंतेची बातमी! यंदा अवघे २५ टक्केच आंबा उत्पादन होणार, खिसे मोकळे करा...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विसस्कळीत होणार आहेत.
गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आंबा पेटी मुंबई तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्रीला आली होती. यावर्षी फेब्रुवारीत आंबा आला, परंतु प्रमाण अत्यल्प आहे. मुंबई बाजारपेठेत रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्गातील देवगड हापूसचे वर्चस्व आहे. सध्या पेटीला १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.
फळधारणा झालीच नाही
यावर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहर प्रक्रियेला प्रारंभ झाला. पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती होती. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर भरपूर आला, परंतु निव्वळ फुलोरा राहिला.
फळधारणा झालीच नाही. मोहरही करपून काळा पडला व कांड्या गळून गेल्या. पुनर्मोहरामुळे फळांची गळ झाली. त्यामुळे झाडावर आंबा अल्प प्रमाणात आहे.
दोन दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानात छोटी फळे टिकू शकणार नाहीत, गळ होण्याचा धोका अधिक आहे. यावर्षी फेब्रुवारीत मोहर नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा असणार नाही. कॅनिंगसाठी बागायतदारांना आंबा कमी उपलब्ध होणार आहे.
राजन कदम, बागायतदार