कोपर्डीत जनसमुदायाने वाहिली श्रद्धांजली

By admin | Published: July 14, 2017 04:57 AM2017-07-14T04:57:22+5:302017-07-14T04:57:22+5:30

कोपर्डी येथील नववीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा अमानुष अत्याचारानंतर खून झाल्याच्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले.

Worshipful tributes to the people of Kopardi | कोपर्डीत जनसमुदायाने वाहिली श्रद्धांजली

कोपर्डीत जनसमुदायाने वाहिली श्रद्धांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोपर्डी येथील नववीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा अमानुष अत्याचारानंतर खून झाल्याच्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले.
कोपर्डीत हिंदू प्रथेप्रमाणे पीडित मुलीचे श्राद्ध घालून राज्यभरातून आलेल्या लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली़ अंत्यसंस्कार झालेल्या जागेत उभारलेल्या स्मारकास संभाजी ब्रिगेडने कडाडून विरोध केल्याने भय्युजी महाराज यांनी कोपर्डी गावात येणे टाळले़ त्यांच्या पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन करून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला़
मानवतेला काळिमा फासणाऱ्या कोपर्डी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर निघालेल्या मराठा समाजाच्या विराट मूक मोर्चांनी वातावरण ढवळून गेले होते; परंतु वर्षभरानंतरही अन्यायाचा हुंदका गिळतच पीडितेच्या आईवडिलांसह गावकऱ्यांनी तिचे श्राद्ध घातले़ पीडितेच्या नातेवाइकांसह राज्यभरातून विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने कोपर्डीत उपस्थित होते़
स्मृतिस्थळासमोर उभे राहून पसायदान म्हणत पीडितेला
श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाणावलेल्या डोळ्यांनी आईवडिलांनी चिमुरडीला श्रद्धांजली अर्पण केली़
पीडित मुलीचे अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर तिचे स्मारक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकाला ‘युगंधरा’ असे नाव देण्याचेही भय्युजी महाराज व कुटुंबीयांचे ठरले होते़
फायबरचा पुतळाही आणला होता़ त्याचे अनावरण भय्युजी महाराज यांच्या हस्ते होणार होते़; परंतु अत्याचाराचे स्मारक नको, अशी भूमिका घेत संभाजी ब्रिगेडने स्मारकास विरोध केला़ त्यामुळे भय्युजी महाराजांनी कोपर्डीचा नियोजित दौरा रद्द केला. तरीही दुपारपर्यंत कोपर्डीत तणावाचे वातावरण होते़
>मुंबई मूकमोर्चात कोटींची डरकाळी
वर्षभरापूर्वी घडलेल्या कोपर्डी घटनेच्या आठवणींना वाट मोकळी करून देत आता लाखोंचे नाही, तर एकच कोटीचा मूकमोर्चा काढण्याचा निर्णय कोपर्डी गावात झालेल्या आढावा बैठकीत गुरुवारी घेण्यात आला़ क्रांतिदिनी निघणाऱ्या मुंबई मूकमोर्चात दिल्ली, गुजरात, पंजाबसह सात राज्यांतून मराठे येणार असून, मराठ्यांचा आता कुणी अंदाज बांधू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला़
वर्षे उलटूनही ना पीडित मुलीला न्याय मिळाला नाही तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या, याकडे समन्वयकांनी लक्ष वेधले़ कोटींच्या संख्येने मुंबई शहरातून मोर्चा काढून मोदी व फडणवीस सरकारला घाम फोडू, असा इशाराही यावेळी देण्यात आला़
>शिक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले
कोपर्डी घटनेला एक वर्षे झाले, तरी अद्याप अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यात आता पीडित मुलीचे स्मारक होण्याची चर्चा सुरू आहे. ही दुदैवी बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली.
>स्मारक नव्हे, समाधी
हिंदू प्रथेप्रमाणे मुलगी गेल्याने तिची समाधी बांधली आहे़ ते स्मारक नसून ती समाधी आहे़ समाधीचा निर्णय हा कुटुंबाचा निर्णय आहे़ ही बाब कौटुंबिक असून, त्यात कुणी राजकारण आणू नये, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
>ठिकठिकाणी मोर्चे
कोपर्डी घटनेला वर्ष झाल्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगावात मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, आदी ठिकाणीही मोर्चे काढण्यात आले.

Web Title: Worshipful tributes to the people of Kopardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.