स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तीदायी स्मृतींना वंदन
By admin | Published: February 26, 2016 03:10 PM2016-02-26T15:10:30+5:302016-02-26T15:10:30+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५० वर्षे झाली
Next
>भारत कुमार राऊत
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५० वर्षे झाली. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन !
ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे त्यांनी केवळ स्वप्न पाहिले नाही, तर तसे प्रयत्नही चालू केले. लंडनमध्येच राहून त्यांनी समविचारी क्रांतिकारक तरुणांचा 'मित्रमेळा' स्थापन केला व क्रांतीकार्य चालवले.
त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यांना कडक बंदोबस्तात जहाजाने फ्रान्सला नेण्यात येत असता मोठ्या शिताफीने ते निसटले व पोहोत फ्रान्सच्या किनाऱ्याला पोहोचले. तिथे ते दुर्दैवाने ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले.
त्यांना अंदमानला ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तिथल्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी कठोर कारावास भोगला. अखेर राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता झाली.
भगूर येथील सावरकर स्मारक
भारतात परतल्यावर रत्नागिरीत त्यांनी समाज सुधारणेचे कार्य आरंभले. समाजातील स्पृश्यास्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी पतितपावन चळवळ सुरू केली. तिथेच त्यांनी भाषाशुद्धी मोहिमही हाती घेतली.
मराठी भाषेत दैनंदिन वापरासाठी त्यांनी अनेक शब्द दिले. मंत्रालय, महापौर, फलंदाज, गोलंदाज आदी शब्द त्यांचेच.
लंडन, अंदमान व नंतरही सावरकरांनी अनेक देशभक्तीपर साहित्यकृती निर्माण केल्या. अंदमानला कैद्यांकडून ते उर्दू भाषा व लिपी शिकले व त्यांनी उर्दूत गझल रचनाही केल्या. सन्यस्त खड्ग सारखी त्यांची नाटके व त्यातील पदे आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
वैज्ञानिक दृष्टीने धर्माकडे पाहताना त्यांनी मांडलेले अनेक विचार वादग्रस्त ठरले. गाय हा उपयुक्त पशु आहे; हिंदू तरुणांनी ब्रिटिश सैन्यात दाखल व्हावे, या सारख्या त्यांच्या विधानांमुळे त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक झाले.
सावरकरांनी हिंदु महासभेच्या कार्याशी नाते जोडले. असे वीर सावरकर. १९६६ मध्ये त्यांना वाटू लागले की यापुढे जगण्यात अर्थ नाही. त्यांनी प्रयोपवेशन सुरू केले व अखेर २६ फेब्रुवारी १९६६ ला देह ठेवला. आपल्या कार्याने, त्यागाने व प्रतिभेने वीर सावरकर अमर झाले.
खासदार पूनम महाजन यांनी फेसबुकच्या माध्यमातून सावरकरांनी आदरांजली वाहिली.